हे पान प्रमाणित केलेले आहे.
२२ । परिचय
 

नसतो, तर नवसर्जनही करीत असतो. क्रमाने ढेरे आपल्या प्रज्ञेला प्रामाणिक राहून, मीमांसेच्या क्षेत्रात खोलवर गुरफटत जात आहेत. हे क्षेत्रच असे आहे की, जिथे निरुपद्रवी दिसणारा एखादा धागा स्वतःलाच हादरा देणाऱ्या गुहेपर्यंत तुम्हाला नकळत घेऊन जातो. 'शक्तिपीठाच्या शोधात ' ढेरे यांच्या बाबतीत असा काही प्रकार घडू पाहत आहे. या ठिकाणी उभे राहून ढेऱ्यांशी भांडण उकरून काढण्यात जी मौज आहे, ती नव्याने उजेडात आलेल्या अपरिचित पोथ्यांची नावे ऐकण्यात निश्चितच नाही.
 ढेरे यांचे नवे पुस्तक (खरे म्हणजे तो एक विस्तृत लेखच आहे) काही शक्तिपीठांचा नव्याने शोध घेत आहे. सर्व भारतभर नानाविध नावांनी व रूपांनी चालणारी देवीची उपासना आहेच. या उपासनेची प्रमुख केंद्रे कोणती याच्या विविध याद्या आहेत. या याद्यांच्यापैकी एक महत्त्वाची यादी पुराणांच्यामधून आणि तंत्रग्रंथांच्या मधून येणारी १०८ शक्तिकेंद्रांची यादी आहे. मला स्वतःला ही यादी इ. स. १००० पेक्षा फारशी जुनी वाटत नाही. या यादीत असणाऱ्या स्थळांची निश्चिती करणे हे एक महत्त्वाचे काम आहे. ढेरे यांनी या यादीतील दोन स्थळांची नोंद केली आहे व एक तिसरे प्राचीन शक्तिपीठ नोंदविलेले आहे. १०८ च्या या यादीतील मकुटेश्वरीचे माकोट हे पीठ म्हणजे आजचे कर्नाटकातील नंदिकेश्वर (ता. बदामी, जि. विजापूर) व या यादीतील युगुलेचे आलापूर म्हणजे आजचे अलंपूर (आंध्रप्रदेशातील महबूबनगर जिल्ह्यातील गाव) असे त्यांनी पुराव्याने दाखवून दिलेले आहे. त्या खेरीज नागपूर जिल्ह्यातील माहूरझरी हेही प्राचीन प्रसिद्ध शक्तिपीठ असल्याची त्यांनी साधार नोंद केली आहे.
 या पुस्तिकेपुरता ढेरे यांचा दावा इतकाच आहे. अत्यंत निरुपद्रवी चेहरा करून ते सांगतील, 'माकोट म्हणजे नंदिकेश्वर, हे मी प्रथमच सिद्ध करीत आहे. जरी यापूर्वी ख्यातनाम संशोधक डॉ. पांडुरंग देसाई यांनी अलंपूर म्हणजे आलापूर हे दाखवून दिले असले तरी अमुक एक देवी म्हणजे युगुला, हे मी प्रथमच दाखवीत आहे. वाकाटकांच्या ताम्रपटात येणारे पृथ्वीपूर म्हणजे माहूरझरी, हेही मी प्रथमच सांगत आहे. ' ढेरे यांचे हे म्हणणे अगदी खरे आहे. संशोधनाच्या क्षेत्रात पुराव्याची संगती जुळवण्याला, चपखल मांडणीला व प्रथमच एखादा मुद्दा सिद्ध करण्याला खूपच महत्त्व असते. पण हे पूर्ण सत्य नव्हे. ही जर केवळ स्थळनिश्चितीची बाब असती तर मग या पुस्तिकेकडे फारसे लक्ष देण्याची गरज नव्हती. एक टिपण म्हणून त्याकडे पाहणे व नोंद घेणे पुरेसे ठरले असते. या पुस्तिकेचे खरे महत्त्व ढेरे यांचा पूरावा आणि त्याची संगती जुळवण्याची त्यांची पद्धत यांत आहे. ढेरे यांचे विवेचन क्रमाने एका अत्यंत वादग्रस्त सिद्धान्ताकडे सरकत आहे. ढेरेमहाशयांना सर्व समजुतींना जो एक जोराचा धक्का द्यायचा आहे, त्याची या पुस्तिकेत पूर्वतयारी