हे पान प्रमाणित केलेले आहे.
२८ । परिचय
 

मराठी साहित्यरचनेचे महत्त्व काव्य म्हणून नसून, सांस्कृतिक इतिहासाचे साधन म्हणून आहे. ह्या मठातच 'देशिक चरित्र' हा, या स्वामींची चरित्रपर माहिती देणारा ग्रंथही उपलब्ध झाला. हे चरित्रपर साधन अठराव्या शतकाच्या शेवटच्या कालखंडातील म्हणजे शके सतराशे सातचे आहे. येथील 'देशिक' शब्द चिंतनीय दिसतो. प्राचीन मराठीत ' राउळ ' सारखे लौकिक स्वामित्व दाखविणारे शब्द जसे 'सद्गुरू' ह्या अर्थाने वापरले जात तसा प्रकार 'देशिक ' ह्या शब्दाचा आहे.
 ती मठपरंपरा मुकुंदराजी परंपरेची असल्यामुळे अतिविवाद्य असणाऱ्या त्यांच्या स्थलकालनिश्चितीवर काही प्रकाश ह्या परंपरेमुळे पडणार हे उघडच आहे. आजतागायत भंडारा जिल्ह्यातील मुकुंदराज परंपरेचे मठच काय ते उपलब्ध होते. आता ही दुसरी परंपरा समोर येत आहे. आश्चर्याची गोष्ट ही आहे की, मुडलगी मठपरंपरा जितकी माहिती पुरविते त्या मानाने भंडारा जिल्ह्यातील परंपरेची माहिती फार त्रोटक आहे.
 मुडलगी मठाने उपलब्ध करून दिलेला महत्त्वाचा मुद्दा हा की, शंकराचार्यांच्या भारती परंपरेत मुकुंदराज येतात. मुकुंदराजांच्या ' श्री शंकरोक्ती वरी। मी बोललो मराठी वैखरी ' ह्या स्पष्टीकरणाला यामळे निराळे महत्त्व येते. भंडारा जिल्ह्यातील अंभोर परिसरातील परंपरांच्यामध्ये हा दुवा स्पष्ट नव्हता. ह्या माहितीमुळेच मराठवाड्यातील मुकुंदराज ते सहजवोध ही परंपरा उजेडात आलेली आहे. मुडलगी मठपरंपरा हरिनाथांनाही अंबानगरीचेच मानते. अंबेजोगाई येथे भारती परंपरेचा आश्रम रामदासांच्या काळापर्यंत होता असा उल्लेख असल्यामुळे, मुकुंदराज हे शंकराचार्यांच्या एखाद्या उपपीठाचे मठाधीश असावेत हे आवळीकरांचे अनुमान संभवनीय वाटू लागते. मात्र तूर्त तरी ते अनुमान आहे असेच म्हटले पाहिजे.
 मुकुंदराजांचा स्थलकालनिश्चय अजून तरी विवाद्य आहे. जिथपर्यंत कालनिश्चितीचा संबंध आहे तिथपर्यंत हे म्हणणे भाग आहे की, शके अकराशे दहा हा विवेकसिंधूचा ग्रंथकाळ मानण्यात अडचणी आहेत, त्या परिहार होण्याजोग्या नाहीत. मुडलगी परंपरेतील शके नऊशे ही जशी एक परंपरेची नोंद, त्याप्रमाणे 'शके अकराशे दाहोत्तरी । साधारण नाम संवत्सरी' हा प्रक्षिप्त पाठसुद्धा एक परंपरेची नोंद आहे. उपोबलक उपोदबलक व समाधानकारक पुरावा सापडल्याशिवाय ह्या नोंदींना निर्णायक महत्त्व देता येणार नाही. स्थलनिश्चितीच्या बाबत मात्र ह्यापुढे जाऊन आपण काही चर्चा करू शकतो. विद्वान मंडळींनी आजतागायत तपशिलाने दोन स्थळांची चर्चा केली आहे. एक पक्ष तर, भंडारा जिल्ह्यातील अंभोर ही मुकुंदराजाची अंबानगरी मानतो. दुसरा पक्ष बीड जिल्ह्यातील अंबेजोगाई हीच अंबानगरी मानतो. एक तिसरा फारसा चचित नसणारा पक्ष आहे. महानुभाव संप्रदायही मुकंदराजांना आपल्या विद्यावंतांपैकी एक मानतो. तो धागा धरून आपण