हे पान प्रमाणित केलेले आहे.
महानुभाव वाङमयाचे संशोधन । ३९
 

गोष्टींचा उल्लेख केलेला बरा. महदाइसेने रुक्मिणीस्वयंवरे रचली किती ? धवळयांच्यामध्ये रचलेला रुक्मिणीस्वयंवराचा पूर्वार्ध शके १२०८ पूर्वीचा म्हणजे गोविंदप्रभूंनच्या निधनापूर्वीचा आहे. उत्तरार्ध ह्यानंतर दहा-बारा वर्षांनंतर म्हणजे शके १२२० च्या सुमारास इतरांच्या सहाय्याने रचला असे मानतात. व्यक्तिश: मला इतरांच्या साह्याची कल्पना स्मृतिस्थळात आलेली असली तरी पटत नाही. पण मातृकी-रुक्मिणीस्वयंवराचे काय ? असे एखादे रुक्मिणीस्वयंवर महदाइसेने रचल्याचा स्मृतिस्थळात उल्लेख नाही. केवळ स्मृतिस्थळात उल्लेख नाही इतक्यामूळे मातृकीरुक्मिणीस्वयंवराचे कर्तृत्व विवाद्य ठरते काय ? आज तरी ह्याबाबत निर्णायक असे काही सांगणे शक्य नाही. महदाइसेला ओव्या गाण्याचा नाद होता. ती ओव्यांच्या मधून कृष्णचरित्र गाई. ती सिद्ध कवियित्री होती ह्याला लीळाचरित्र व स्मृतिस्थळ दोन्ही ठिकाणी पुरावा आहे. जर हा पुरावा खरा मानला तर महदाइसेने ओव्यांच्या मधुन कृष्णचरित्र गाणे हे तर संभाव्य वाटतेच पण धवळेसुद्धा तिने वेळोवेळी रचले असावेत असे दिसते. गोविंदप्रभूच्या विवाहाच्या प्रसंगी ते गायिले असावेत इतकेच तथ्य शिल्लक राहते. महदाइसेसारख्या सिद्ध कवियित्रीला परमेश्वराचा आशीर्वाद धवळे गाण्यासाठी लागावा असे कोणते अलौकिकत्व धवळ्यात दिसत नाही. विवाहमंगल गीतांच्या साध्यासुध्या परंपरेतील ही रचना आहे.
 ह्या मातृकी-रुक्मिणीस्वयंवराला एक महत्त्व आहे. नरेंद्राच्या रुक्मिणीस्वयंवरापूर्वीसुद्धा महानुभाव संप्रदायात कृष्णचरित्र सांगितले, ऐकले जातच होते. स्वतः चक्रधरच अनेकदा कृष्णकथा सांगत असत. ह्याच्या खुणा ' लीळा चरित्रा' त आहेत. ह्या दृढ आधारावरच पुढे चक्रधरोक्त 'श्रीकृष्ण-चरित्र' हा ग्रंथ सजविला गेला आहे. वाढविला गेला आहे. माझे मित्र डॉ. ढेरे ह्यांनी ह्या चक्रधरोक्त श्रीकृष्ण-चरित्रात असणा-या रुक्मिणीस्वयंवर-कथेकडे लक्ष वेधले आणि हे दाखविले की, नरेंद्रात असणारी किन्नराची कथा सदर कृष्णचरित्रात आहे. लोकपरंपरेने कृष्णचरित्र सारखे प्रवाहित होत आले आहे. भागवतात नसणाऱ्या कितीतरी कथा अशा परंपरेत आलेल्या आहेत. शापित किन्नराची कथा अशी लोकपरंपरेने चालत आलेली कथा असावी काय ? ती चक्रधर सांगत असावेत काय ? डॉ. ढेरे यांनी प्रथम असे मत दिले की, ही किन्नरकथा चक्रधरोक्त आहे. तेथून नरेंद्राने उचलली व वाढविली. नंतर त्यांनी असे मत दिले की, मुळात चक्रधरोक्त ' श्रीकृष्णचरित्र'च उत्तरकालीन आहे. हे कृष्णचरित्र लिहिणाऱ्यांनी नरेंद्राची उचल केली. मातृकी रुक्मिणीस्वयंवर महदंबेचे काय ? ह्या प्रश्नाला महत्त्व आहे. कारण त्यात किन्नर कथेचा उल्लेख आहे. महदाइसेने जर आधार स्वीकारलेला असला तर तो चक्रधराने