या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

चक्रपाणि । ६५

आहेत. यामुळे तेराव्या शतकात गुरूचा पित्याप्रमाणे उल्लेख करण्याची प्रथा सर्रास रूढ होती आणि सूत, पूत, कुमर, दुहिता हे सर्व शब्द शिष्यवाचक; आणि तात, पिता हे शब्द गुरुवाचक वापरले जात होते, असे ठरते. असाच एक शब्द दासी आहे. जनाबाई ही नामदेवांची दासी आहे; कारण ती स्वतःच आपला दासी म्हणून उल्लेख करते. अनेकांची अशी समजत झालेली दिसते की, जनाबाई गुलाम होती. दास-दासी आपल्या घरी बाळगण्याजोगा नामदेव कुणी सधन माणूस नव्हता. पण जनाबाईच्या खेरीज नामदेवाच्या नात्यातील एक नागरी या नावाची संतकवयित्री आहे. तीही स्वत:ला दासी म्हणवते. तेव्हा दासी शब्द शिष्यवाचकही आहे; तो केवळ गुलामवाचक नव्हे, हेही समजून घ्यायला पाहिजे. तुकाराम वैश्यवाणी असल्याची एक समजूत आहे. तुकारामांनी आपण शूद्र असल्याचा उल्लेख केलेला आहे. खरे म्हणजे तुकाराम मराठा आहेत. कलियुगात ब्राह्मण व शूद्र दोनच वर्ण राहतात, अशी समजूत आहे. तुकारामांच्या घरी सावकारी व व्यापार आहे. ते वैश्य नाहीत, तसे वाणीही नाहीत. आणि ते शूद्र आहेत, याचा अर्थ ब्राह्मण नाहीत, इतकाच आहे.
 प्राचीन वाङमयातील शब्दांचे, ते शब्द वापरणाऱ्यांना अभिप्रेत असणारे अर्थ कोणते, हा नेहमीच वादविषय राहत आला आहे. याबाबत वेळोवेळी निरनिराळे संशोधक चर्चा करीत आलेले आहेत. ढेरे यांनी या प्रबंधात ओघाओघाने निरनिराळ्या शब्दांची चर्चा केलेली आहे. विसोबा यांच्या नावाला खेचर जोडला गेलेला आहे. या खेचर शब्दाचा अर्थ काय ? म. म. पोतदार यांना खेचर या आडनावाचे घराणे सापडले त्यावरून त्यांनी खेचर हे आडनाव असावे, असे मत दिले. खेचर आडनाव असायला हरकत नाही. पण मुळात खेचर हा शब्द देहभावविगलित झालेला योगी या अर्थाचा आहे. मी इतकेच म्हणेन की, खेचर हा शब्द योगी, तपस्वी या अर्थाचा आहे. महीपतीला या शब्दाचा हा अर्थ जाणवलेला दिसत नाही. त्याच्यासमोर खेचर प्राणी आहे. त्याला अनुसरून त्याचे स्पष्टीकरण महीपतीने दिलेले आहे. असाच एक शब्द गुरुमुख आहे. गुरुमुख आणि मनमुख अशी ही शब्दांची जोडी आहे. या सिद्ध संप्रदायातील संज्ञा आहेत. गुरुमुख म्हणजे मनाची स्थिरपणे अध्यात्मप्रवण झालेली वृत्ती. यामुळे गुरुमुखी या शब्दाचा मूळ अर्थ मोक्षोपयोगी संतवाणी असा आहे, असे ठरते. आज पंजाबमधील एका लिपीला गुरुमुखी हे नाव प्राप्त झालेले आहे. स्थल शब्दाचा ब्रह्म हाही एक अर्थ त्यांनी स्पष्ट केलेला आहे. हा अर्थ मराठीत तेराव्या शतकात रूढ होता, हेही ढेरे यांनी दाखवून दिले आहे. माझी स्वतःची अशी समजूत आहे की, योगाचारपंथीय बौद्ध आलयविज्ञान हा शब्द वापरतात. त्यांचे आलयविज्ञान स्थिर आहे. या आलय शब्दाचे एक रूप पुढे स्थल झालेले आहे. बौद्धांचे ब्रह्म आलय आहे. वेदांत्यांचे ब्रह्म स्थल झालेले दिसते. महाराष्ट्रात