या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

चक्रपाणि । ६७

म्हणून ते आपल्या वैराग्य-उपासनेला वीर उपासना मानतात; वीररस सर्वश्रेष्ठ मानतात आणि वर्धमानाला महावीर मानतात. योगसाधना करणाऱ्या शैवांनी वीर हा शब्द तेथून उचललेला आहे. अनेक शैव स्वतःचा आचार वीराचार मानतात. अनेक काश्मीरी शैव तांत्रिक स्वतःला वीराचाराचे पुरस्कर्ते मानतात. म्हणून शैवागम आणि वीरशैव हे दोन शब्द लिंगायत संप्रदायाचे द्योतक असतीलच, याची खात्री नाही. आणि लिंगायत संप्रदायात असणारे षटस्थल तत्त्वज्ञान ज्यांनी स्वीकारले, ते संप्रदायाने लिंगायत असतीलच असे नाही. म्हणून तेराव्या शतकातील वारकरी व महानुभाव संप्रदायावर जो शैवागमाचा परिणाम दिसतो, तो शैवांच्यामध्ये लोकप्रिय झालेल्या भूमिकांचा परिणाम आहे. हा परिणाम नेहमी लिंगायत संप्रदायातून आलेला असेलच, याची खात्री नाही. या शैवांनी देशिक या शब्दाला तपस्वी असा अर्थ दिलेला आहे. हा मुद्दा शाक्त देशिकेंद्रनाथ यांच्या नावाचा अर्थ समजण्यासाठी उपयोगी आहे.
 चांगदेवांचे मणिसिद्ध हे एक नाव आहे (पृष्ठ १३२). या शब्दाचा अर्थ उर्ध्वरेता असाच आहे, दुसरा नाही. हा शब्द बौद्ध वज्रयान परंपरेने येतो. वज्रयान संप्रदायाचे प्रभावी अस्तित्व वेरूळच्या बौद्ध लेण्यांतून डॉ. आर. एस. गुप्ते यांनी सिद्ध केलेले आहे. तेव्हा बौद्ध संकेतांचे अवशेष मराठीत सापडतात यात नवल नाही. पृष्ठ १९५ वर 'नागार्जुन शैव असो की बौद्ध असो,' असा उल्लेख आलेला आहे. खरे म्हणजे माध्यमिक बौद्धांचा नेता नागार्जुन हा बौद्धच आहे. नागार्जुनाच्या सार्वत्रिक मान्यतेमुळे नंतरच्या काळात शैवांनी नागार्जुन आपला मानलेला आहे. बौद्ध नागार्जुनाचे ग्रंथ उपलब्ध आहेत. त्यांत त्याने आपण पूर्वी शैव असल्याचा उल्लेख केलेला नाही आणि नागार्जुन हा उत्तरायुष्यात शैव होण्याचा संभव नाही. म्हणून शैव नागार्जुन ही उत्तरकालीन शैवांनी निर्माण केलेली एक कल्पनाच म्हटली पाहिजे. ती एक Myth आहे.
 ढेरे यांच्या या सगळ्या संशोधनामुळे सर्वांत महत्त्वाचा परिणाम होणार असेल, तर तो महानुभाव संप्रदायाच्या अभ्यासावर होणार आहे. महानुभाव संप्रदाय वैदिक आहे की अवैदिक आहे, हा एक विद्वानांनी चर्चिलेला मुद्दा आहे. परंपरेने महानुभाव धर्म म्हणून वागत नसून संप्रदाय म्हणून वागत आलेले आहेत, असे मानलेले आहे. महानुभाव ब्राह्मणांचे सोयरसंबंध वैदिक महानुभावेतर ब्राह्मणांशी आहेत. महानुभाव मराठ्यांचे सोयरसंबंध महानुभावतर मराठ्यांशी आहेत. आणि वधूवर दोघेही महानुभाव असले, तरी त्यांची लग्ने लावण्यासाठी वैदिक ब्राह्मण बोलावण्याची प्रथा आहे. ही गोष्ट महानुभावांना मान्य आहे. मग ती संशोधकांना मान्य असो अगर नसो. चक्रधरस्वामी नागदेवाचार्यांकडून पुरुषसूक्ताचा नित्यपाठ करून घेत असत. आणि महानुभावांचे जे तत्त्वज्ञानविवरणपर टीपग्रंथ आहेत,