या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

७० । परिचय

शास्त्राच्या मांडणीनुसार महानुभाव दर्शन वेदान्तसंलग्न ठरते की न्यायसंलग्न ठरते, याचे माझे उत्तर हे की, ते वेदान्तसंलग्न आहे. पण जर परंपरेने महानुभाव स्वतःला न्यायसंलग्न मानत असतील, तर त्यांची तशी समजूत आहे, हे मान्य करावे लागेल आणि महानुभाव आपल्या समजुतीनुसार हिंदू तर आहेतच, पण त्यांच्या श्रद्धेनुसार ते वैदिकही आहेत, हे मान्य करावे लागेल. आजच्या संशोधकांच्या इच्छांच्याखातर त्यांना अवैदिक मानता येणार नाही.
 या ग्रंथातील एक महत्त्वाचा मुद्दा हरिनाथ हेच चक्रधर होत, हा आहे. खरे म्हणजे हा मुद्दा चाळीस वर्षांपूर्वी डॉ. य. खु. देशपांडे यांनी मांडायला हवा होता. कारण मेघचंद्रकृत यक्षदेव आम्नायाचा वृद्धान्वय' या ग्रंथातील माहितीकडे प्रथमत: त्यांनी लक्ष वेधले. हरिनाथ यानेच रामदेवास वेदान्त सांगून हरिनाथ→रामदेव →मुकुंदराज या वेदान्त परंपरेचे प्रवर्तन केले. या हरिनाथानेच नागेंद्रास सिद्धांत सांगून हरिनाथ→नागेंद्र या परंपरेचे म्हणजे महानुभाव परंपरेचे प्रवर्तन केले, या बाबीची नोंद य. ख. देशपांडे यांनी केलेली आहे. तेव्हा यक्षदेवआम्नायकाराच्या मते मुकुंदराजांचे आजेगुरू हरिनाथ आणि नागदेवाचार्यांचे गुरू चक्रधर या दोन व्यक्ती एकच आहेत, हे यशवंत खुशालांना माहीत होते. हे चक्रधर-हरिनाथ-ऐक्य आपल्याला मान्य नाही, असेही त्यांना म्हणता आले असते. पण यांपैकी त्यांनी काहीही म्हटले नाही. य. खु. देशपांडे यांना यक्षदेवआम्नाय अंबानगरी म्हणत असताना फलटणचा उल्लेख करीत आहे, हेही माहीत असायलाच हवे. यक्षदेवआम्नाय हा ग्रंथ संपूर्णपणे प्रकाशित करणे त्याही वेळी अवघड नव्हते. पण असे जर डॉ. देशपांडे यांना करावेसे वाटले असते, तर मग त्यांना अंभोरे पक्षाच्या वतीने हा पुरावा उद्धृत करता आला नसता. यक्षदेवआम्नायातील सर्व ग्रंथकार हरिनाथ आणि चक्रधर यांना एक गृहीत धरतात. गोंधळ राहू नये, म्हणून मुकुंदराजांच्या विवेकसिंधु या ग्रंथाचा उल्लेख करतात. हे उल्लेख पद्य वाङमयात आहेत, तसे गद्य वाङमयात आहेत. पण या कल्पनेला आरंभ यक्षदेवआम्नायपासून होत नाही. यक्षदेवआम्नायाच्या पूर्वी दर्शनप्रकाशकार मुरारी आहे. त्याचीही भूमिका हीच आहे. आणि महानुभाव संप्रदायात यक्षदेवआम्नायाखेरीज असणाऱ्या इतर लेखकांनीही ही भूमिका नोंदविलेली आहे.
 मी स्वतः महानुभाव सांप्रदायिकांनी सोळाव्या शतकापासून हरिनाथ-चक्रधरऐक्याची भूमिका सातत्याने नोंदविलेली आहे, ही बाब गंभीर चिंतन करण्याजोगी मानली असती; पण निर्णायक मानली नसती. मुकुंदराज आणि हरिनाथ या दोघांनाही आपल्या संप्रदायात पचवण्याचा हा प्रयत्न आहे, ही शक्यता शिल्लक राहिलीच असती. पण ज्योतिनाथासारखा, मुकुंदराज परंपरेतच असलेला, विवेकसिंधूच्या ओव्या जागोजाग उद्धृत करणारा महानुभावेतर ग्रंथकार जेव्हा हीच