या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

७६ । परिचय

णार. परिणामी उद्धवगीता आणि ज्ञानप्रबोध यांवर ज्ञानेश्वरीची छाया तपासण्यात अर्थ असतो. ती सापडेल अगर न सापडेल. नरेंद्राचा रुक्मिणीस्वयंवर ग्रंथ लीळाचरित्रापूर्वीचा नाही, तो ज्ञानेश्वरीपूर्वीचा असण्याचा संभव कमी आहे. ढेरे यांचे एक संशोधन असे की, बहिरा जातवेद हा नामदेवपूर्वकालीन कवी आहे. तेव्हा तो ज्ञानेश्वरालाही पूर्वकालीन असण्याचा संभव आहे. बहिरा जातवेदाचे ग्रंथ ज्ञानेश्वरापूर्वी पाच-सात वर्ष लिहिलेले असू शकतील. बहिरा जातवेद आणि ज्ञानेश्वर यांच्यापूर्वीचे महानुभाव वाङमय किती, या प्रश्नाच्या निर्णयावर आद्य महानुभावीय मराठी वाङमय युगप्रवर्तन करते की प्रवर्तित युगाचा भाग बनते, याचे उत्तर ठरणार आहे. आपण काळ नोंदवताना महानुभावीय ग्रंथ ज्या काळातील म्हणून नोंदवतो आणि विवेचन करताना ज्या पद्धतीने विवेचन करतो, त्याचीही एकदा संगती लावावी लागेल. स्मृतिस्थळाचा नेमका काळ कोणता ? हा काळ पारखे यांना अनुसरून ढेरेही शके १२३४ गृहीत धरीत आहेत. तो माझ्या मते अजून थोडा पुढे म्हणजे १२४० पर्यंत पुढे जातो. या वेळी नागदेवाचार्यांचे वय ६६ वर्षांचे होते. हे लक्षात घेतले व महदाईसा त्यांची धाकटी बहीण हेही तथ्य नोंदवले, तर त्याचा अर्थ हा होतो की, महदाईसा ही बालविधवा आहे. ती चक्रधरांच्या सहवासात येऊन शिष्यत्वाने राहू लागली, तेव्हा तिचे वय ऐन विशीत होते. लीळाचरित्रात म्हातारी हा शब्द वय सांगेलच, याची खात्री नाही. तो पुष्कळदा स्त्री इतकेच सांगतो.
 चांगदेव राऊळ हे सिद्धसंपर्कात आलेले लकुलीश. ते ऊर्ध्वरेते म्हणून प्रसिद्ध होते. त्यांच्या हाती झाडू व सूप असे. ही मातंगी संप्रदायाची चिन्हे आहेत. गुंडम राऊळसुद्धा स्त्रीवेष धारण करीत असत. ज्या क्रमात गुंडम राऊळ आणि चांगदेव राऊळ आहेत, तो क्रम एका बाजूने रावळ उपासना मानणारा म्हणजे लकुलीश शैव आहे, तर दुसऱ्या बाजूने या क्रमात शाक्त, तांत्रिक आणि मातंगी संप्रदायही थोडा थोडा मिसळलेला आहे. चांगदेव राऊळ ऊर्ध्वरेते म्हणूनच प्रसिद्ध होते, गोरखनाथ हेही ऊर्ध्वरेते होते. म्हणून तेही स्त्रीसंबद्ध तंत्रोपासना आचरणारेच होते, हे आता ढेरे यांनी कबूल केले हे बरे झाले. पूर्वी ते हा मुद्दा कबूल करीत नसत. चांगदेव राऊळ ऊर्ध्वरेते होते, तेव्हा त्यांच्या उपासनेत स्त्रीला साधिका म्हणून स्थान असणारच. या चांगदेव राऊळांच्या जीवनाच्या पूर्वभागाचा मातंगीपट्ट संप्रदायाशी संबंध आहे. चांगदेव राऊळांच्या जीवनाचा पूर्वभाग जैनविरोध, वेदाचरण, शांकर अद्वैत यांनी भरलेला आहे, तसा तंत्रोपासना, मातंगी संप्रदाय व ऊर्ध्वरेता होणे याही साधनांनी भरलेला आहे. हेच चांगदेव राऊळ पुढे नवपंथप्रवर्तन करतात. यात घोटाळा झाला म्हणजे मातंगीपट्ट संप्रदाय व महानुभाव संप्रदाय यांच्यात गोंधळ होऊन महानुभावांच्या बदनामीच्या निंद्य उद्योगाला आरंभ होतो.
 फलटण येथे चांगदेव राऊळ यांना स्वत:ची स्त्री रतीचिया चाडा विनविते,