या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

८२ । परिचय

प्रतिभा ख्याती देईल या खात्रीवर ते असते. लाखो लोकांच्या नित्य पठनात असणाऱ्या सर्वपरिचित ग्रंथाच्या संदर्भात वाङमयचौर्य होत नसते. झाले आहे ते इतकेच की, रंगनाथ मोगरेकरांची टीका ज्ञानेश्वरीने कमालीची प्रभावित झालेली आहे. रंगनाथांनीही ते मान्य केले असते. पण नमन करताना ज्ञानेश्वराला मात्र त्यांनी नमन केलेले नाही. आपणावर प्रभाव टाकणाऱ्या सर्वांना काळजीपूर्वक न विसरता नमन करावे इतका व्यवस्थितपणा देशस्थ ब्राह्मणाकडून अपेक्षू नये.
 ज्ञानेश्वरीच्या सांप्रदायिक प्रतीबाबत शासनाने जो गोंधळ केला आहे त्याविषयी माझे मत देहूकरांशी जवळजवळ मिळतेजुळते आहे. वारकरी संप्रदायाच्या लाखो भाविकांसाठी सांप्रदायिक ज्ञानेश्वरी उपलब्ध करून द्यावयाची असेल तर प्रत्येक ओवीचा अर्थ सुबोध व नेमका हवा. शासकीय प्रतीत तिथेच गोंधळ आहे. प्रत संप्रदायमान्य हवी. पण इथेही गोंधळ आहे. 'शासकीय समितीने हे काम अतिशय बेजबाबदार पद्धतीने केले आहे,' या देहूकरांच्या मताशी मी सहमत आहे. माझा मतभेद आहे ते ठिकाण म्हणजे कोणत्या प्रतीला संप्रदायमान्य म्हणावे ह्या मुद्दयावर. देहूकर अतिशय दृढपणे सांप्रदायिक ज्ञानेश्वरी म्हणजे एकनाथीप्रत होय, असे गृहीत धरून चालले आहेत. आणि तिथेच एक घोटाळा आहे. घोटाळा प्राचीनांचा नसून अर्वाचीनांचा आहे. आणि घोटाळा एक नसून घोटाळे अनेक आहेत.
 एकनाथांनी ज्ञानेश्वरीची एक प्रत सिद्ध केली. ती सर्व वारकरी प्रमाण मानतात इथवर ठीक आहे. पण ज्ञानेश्वरी छापली जाण्यापूर्वी एकोणिसाव्या शतकापर्यंत प्रत्येकजण असे मानत आला की, त्याच्याजवळ असणारे हस्तलिखित हेच एकनाथप्रणीत पवित्र ज्ञानेश्वरी होय. साखरेप्रत, दांडेकरप्रत यांच्यासह कुंटे, भिडे, बंकटस्वामी इत्यादी सर्व प्रती सांप्रदायिकच आहेत. आणि १८-१९ व्या शतकांतील उपलब्ध असणारी शेकडो हस्तलिखिते सांप्रदायिकच आहेत. संप्रदाय चिकित्सेवर उभे नसतात; आपल्या हाती आहे ते शुद्ध व पवित्र आहे अशा श्रद्धेवर उभे असतात. दांडेकरीप्रतसुद्धा यथामूल पुनर्मुद्रण आहे, याची खात्री कोण देणार? ते तपासूनच ठरवावे लागेल.
 शिवाय एकनाथपूर्वपरंपरेच्या ज्ञानेश्वरीच्या प्रती आहेत त्या काय कोणी पाखंडी आणि पाप्यांनी थोड्याच सिद्ध केल्या आहेत ? त्याही श्रद्धाळू भाविकांनीच सिद्ध केलेल्या आहेत. राजवाडे, माडगावकर, हर्षे, पां. ना. कुलकर्णी, खुपरेकरशास्त्री यांच्या प्रती असांप्रदायिक म्हणण्याचे कारण नाही.
 संप्रदाय प्रमाणप्रत छापता येत नसते हे खरे सत्य आहे. कारण सर्व संप्रदाय प्रमाणप्रती ह्या उपगटांना प्रमाणच वाटत असतात. दांडेकरांना अनुयायी आहेत, तसे साखरे महाराजांनाही आहेत. आपल्याहून भिन्न असणारा पाठ हा असांप्रदायिक