पान:पाणी! पाणी!! (Pani ! Pani !!).pdf/129

हे पान प्रमाणित केलेले आहे.

 'साहेब, तुमी आशा दावली. तशी सुरुवात पण झाली आणि तुमची तेवढ्यात बदली झाली... आणि पुन्हा ये रे माझ्या मागल्याप्रमाणे गावाची गत झाली की हो...!'

 आणि पाटील भाभड़ा सांगत सुटले. खरी तर आता जगदीशला एक मीटिंग अटेंड करायची होती व त्यानंतर केसवर्क होतं; पण त्या भाबड्या, दुर्दैवी जीवाला भरभरून तळमळीनं बोलत असताना थांबवावं असंही वाटेना... मुख्य म्हणजे जगदीशला त्याच्या विकास प्रशासन या आपल्या संकल्पनेतील फोलपणा प्रकर्षाने जाणवत होता आणि पंधरा वर्षांपूर्वीची त्यानं इराच्या वाडीला डेप्युटी कलेक्टर म्हणून दिलेली भेट आठवत होती....

 कडक उन्हाचे दिवस... नेहमीच अपुरा पडणारा पाऊस... त्यात या वर्षी फारच अल्प पाऊस झालेला, म्हणून गावोगावी मार्च - एप्रिलपासून उद्भवलेली पाणीटंचाई. त्यावर मात करण्यासाठी जगदीशन विभागाची सारी यंत्रणा कामी लावलेली. तो स्वतः गावोगावी हिंडत होता व पाण्याचा प्रश्न सोडवत होता.

 इतक्या वर्षांच्या नियोजनानंतरही अनेक गावांना उन्हाळ्यात पेयजलाची टंचाई भासावी ही वस्तुस्थिती नुकत्याच नोकरीत शिरलेल्या व संस्कारक्षम मनाच्या जगदीशला अस्वस्थ करीत होती. चुकीचे नियोजन, अयोग्य झालेले काम व त्यातला भ्रष्टाचार, सतत होणाऱ्या वृक्षतोडीमुळे बिघडलेलं पर्यावरणाचे संतुलन व होणारी धूप... अनेक कारणं होतीच; पण एका बाजूला परकोटीची उदासीनता, तर दुस-या बाजूला राजकारणी व अधिकारी-कर्मचा-यांची भ्रष्टाचारासाठी होत असलेली हातमिळवणी... त्यामुळे नळयोजनांचा उडालेला बोजवारा...

 जगदीशला गावोगावी हेच चित्र थोड्या-फार फरकानं दिसत होतं आणि सरकारी उपाययोजना मूळ समस्येला हात घालायला अपुरी होती, केवळ मलमपट्टी असेच तिचे स्वरूप होते.

 असाच एक रखरखीत दिवस... सकाळपासून तीन गावांचा दौरा करून उन्हानं जगदीश काहीसा कावला होता आणि थोडा वेळ विश्रांतीसाठी ईटला विश्रामगृहात थांबला होता. तेव्हा त्याला गिरदावरनं निरोप दिला की, ईटच्या आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. देशपांडे त्याला भेटण्यासाठी आले आहेत.

 जगदीशनं डॉक्टरांना बोलावलं. त्यांच्याबद्दल तो बरंच ऐकून होता ग्रामीण भागात प्राथमिक आरोग्य केंद्राच्या मुख्यालयी सहसा डॉक्टर घर करून राहत नाहीत;

नारुवाडी / १२७