पान:पाणी! पाणी!! (Pani ! Pani !!).pdf/141

हे पान प्रमाणित केलेले आहे.
१०. दौरा


 ‘रोटेगाव....'
 बराच वेळ झाला तरी रेल्वे एका आडगावी उभी होती, म्हणून प्रदीपनं खिडकी उघडून प्लॅटफॉर्मवर रेंगाळणा-या एका खेडुताला गावाचे नाव विचारलं होतं.

 त्यानं गावाचे नावे तर सांगितलं होतंच; पण गाडी एका मालगाडीच्या क्रॉसिंगसाठी थांबून आहे ही माहितीही दिली. तेव्हा प्रदीपला आश्चर्य वाटल्यावाचून राहिले नाही. मुंबई - औरंगाबाद एक्स्प्रेस मालगाड़ीसाठी एका छोट्या स्टेशनवर तब्बल अर्धा घंटा खोळंबून राहाते, हे त्याच्या कल्पनेपलीकडचं होतं. हा त्याचा पत्रकार म्हणून मराठवाड्याचा पहिलाच दौरा होता.

 ‘पावनं म्हमईचे दिसत्यात...' त्या मळक्या पैरणीतल्या व विटका फेटा बांधलेल्या शेतक्यानं तंबाखू चोळीत विचारले, तेव्हा प्रदीपनं उत्तर दिलं,

 "होय, मुंबईचे. आम्ही काही पत्रकार औरंगाबाद जिल्ह्यातील दुष्काळ पाहण्यासाठी चाललो आहोत.

 तो छोटासा, फरशी नसलेला प्लॅटफॉर्म माणसाअभावी सुनासुना व तिथं कसलीही दुकानं, स्टॉल नसल्यामुळे ओकाबोका वाटत होता. प्रदीपला मुंबईतला गर्दीने गच्च भरलेला प्लॅटफॉर्म पाहायची सवय. हा विस्तीर्ण पसरलेला व संथ सुस्तावलेला प्लॅटफॉर्म ज्या दुष्काळाची पाहणी करण्यासाठी मुंबईच्या पत्रकारांचा पालकमंत्र्यांनी दौरा आयोजित केला होता, त्याची झलक दाखवीत होता. रुळांपलीकडे पसरलेलं विस्तीर्ण मैदान काळपट करडे व निष्पर्ण होतं.

दौरा / १३९