पान:पाणी! पाणी!! (Pani ! Pani !!).pdf/164

हे पान प्रमाणित केलेले आहे.

 कारखाना आहे. यंदा त्यांनी केवळ आपल्या जिल्ह्यातच नव्हे, तर मराठवाड्यातील सातही जिल्ह्यांत व सर्व तालुक्यांत एजंटस् पाठवून बेभाव जनावरे खरेदी केली आहेत; पण आता आपण या जिल्ह्यात जवळपास चाळीस गुरांच्या छावण्या उघडल्यामुळे त्याला फार मोठी खीळ बसली आहे.'

 ‘मग त्यात वाईट काय आहे गुरुजी ? शासनाचा सारा प्रयास या दुष्काळात पशुधन वाचवावं यासाठीच आहे.' भावे सरळपणे म्हणाले.

 ‘सर, आपण शासनाचे आदेश ‘लेटर अँड स्पिरिट' प्रमाणे घेता - पाळता व तसे काम करता. पण शासनाचे काही लोकप्रतिनिधी... त्यांना हे रुचत नाही. ते तुम्हालाही बदनाम करायला मागे - पुढे पाहणार नाहीत.'

 ‘तुमचा इशारा माझ्या लक्षात आला गुरुजी; पण आपल्या जिल्ह्यात इतक्या खालच्या पातळीवर येऊन विचार करणारे लोकप्रतिनिधी असतील असं वाटत नाही... असले तरी माझ्या डोळ्यास डोळा भिडवून ते सामना करतील हे शक्य नाही.' भावे आत्मविश्वासानं म्हणाले.

 ‘बरं, दुसरी बाब कोणती'

 ‘या भयानक गर्मी - उन्हामुळे जनावरांचे काही रोग बळावतील. आमच्या तिन्ही छावण्यांत पुरेशी औषधी आहे; पण सर्वत्र ही परिस्थिती नाही. काही ठिकाणी प्रशिक्षित व्हेटरनरी डॉक्टर वा कंपाऊंडर नाहीत. तुम्ही पशुवैद्यकीय खात्यामार्फत दररोज डॉक्टर्सची व्हिजिट सर्व ठिकाणी लावली तर बरं होईल.'

 ‘तुमची ही सूचना रास्त आहे. मी लगेच त्यावर कार्यवाही करतो.'


 चाऊसशेठनी पुन्हा एकदा काजू-मनुकांचा बोकणा भरला आणि पलंगावरचे पाय लांब केले. बेचैन असले की घडीघडीला त्यांना ड्रायफूटस लागायचे मघाशीच अल्तमश व हयातखान त्यांचा निरोप घेऊन गेले होते व बजावूनही गेले होते,

 ‘चाऊसशेठ, आप हमारे कम्पनी के इस जिले के मेन एजंट, इस साल ये क्या हो गया ? पूरे जिले में गुरों की छावनी खुलने से इस दस-पंधरा दिन में हमे एक भी जानवर काटने को नहीं मिला.'

पाणी! पाणी!! / १६२