पान:पाणी! पाणी!! (Pani ! Pani !!).pdf/166

हे पान प्रमाणित केलेले आहे.

 प्रत्येक दुष्काळात चाऊसशेठनं कंपनीला मागणीप्रमाणे मोठी जनावरं - गाय, म्हशी, बैल व रेडे कमी भावानं पुरवले होते. त्यांनी आपल्या हस्तकांचे जिल्हाभर पद्धतशीर जाळंच उभारलं होतं. पुन्हा प्रशासनाची शिथिलता त्यांच्या पथ्यावर पडायची. जनावरं वाचविण्यासाठी यापूर्वी कधी शर्थीचे प्रयत्न झालेच नाहीत, त्यामुळे चाऊसशेठना फारसं काही करावं लागलं नव्हतं.

 पण यंदाचा प्रसंग बाका होता. भावे कलेक्टरांनी चाळीस गुरांच्या छावण्या जिल्ह्यात उघडल्यामुळे व तेथे जनावरांची उत्तम देखभाल होत असल्यामुळे शेतकरी जनावरे न विकता गुरांच्या छावणीत दाखल करीत होते. आणि यापूर्वी ज्यांनी वाट न पाहता कमी भावात जनावरं विकली, ते हळहळत होते.

 चाऊसशेठची माणसं हात हलवीत परत येत होती.

 दररोज अल्तमश व हयातखानचा तगादा वाढत होता. भाषाही दिवसेंदिवस अधिकाराच्या दर्पानं कडवट होत होती.

 चाऊसशेठ स्वतःला प्रतिष्ठित समजत असल्यामुळे त्याच्या लेखी हे दोघे कंपनीचे नोकर म्हणून कमी दर्जाचे होते; पण त्यांचं बोलणं व इशारे जळफळत का होईना निमूटपणे ऐकून घ्यावे लागत होते. या पंधरा दिवसांत कंपनीकडून एक पैसाही मिळाला नव्हता.

 'कुछ तो करना ही पडेगा.' चाऊसशेठच्या मनात विचार पक्का होत होता. या गुरांच्या छावण्या बंद पडल्या पाहिजेत किंवा शेतक-यांचा विश्वास उडाला पाहिजे, तरच शेतकरी आपली जनावरे पाठवणार नाहीत किंवा काढून घेतील. असं काही घडलं तरच कंपनीचं नुकसान भरून निघेल.

 पण हे कसं करावं हे उमगत नव्हतं.

 सरकारविरोधी सतत लिहिण्यातच आपल्या वृत्तपत्राचा स्वदेशी व डावा बाणा सिद्ध होतो, अशी श्रद्धा असणारया वृत्तपत्राचा दिनेश सावंत हा वार्ताहर होता. गेली तीन वर्षं या पेपरमध्ये काम करीत असल्यामुळे त्याचाही दृष्टिकोन पक्का झाला होता.

पाणी! पाणी!! / १६४