पान:पाणी! पाणी!! (Pani ! Pani !!).pdf/24

हे पान प्रमाणित केलेले आहे.

साधन हिरावून घेतात - का, का म्हणून आम्ही सैनिकांनी आपला जीव धोक्यात घालायचा ? या... या क्षुद्र स्वार्थी ब्लडी सिव्हिलियनसाठी?'

 "मी आपलं दुखणं समजू शकतो कांबळे साहेब-" तो सर्व्हेंअर म्हणाला. 'माझा मोठा भाऊ पण सैन्यात होता आणि एकाहत्तरच्या युद्धात बांगला देशात त्याला वीरगती प्राप्त झाली...'

 क्षणभर महादूही गंभीर झाला. सर्व्हेंअरचा भाऊ त्याचा परिचित होता. एवढंच नव्हे, तर त्याच्याच तुकडीत जवान होता आणि युद्धाच्या धुमश्चक्रीत तो महादूच्या डोळ्यासमोर मारला गेला होता.

 ‘पण अलाईनमेंट बदलणं हा घोर अन्याय आहे साहेब-' काही वेळानं महादू म्हणाला, 'तुम्हीच सांगा, आता मी काय करू?'

 'त्यासाठी तुम्हाला वरपर्यंत गेलं पाहिजे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी किंवा कलेक्टर, पण तूर्त तुम्ही पाझर तलावाच्या कामासाठी तुमची संमती मागायला अधिकारी येतील, तेव्हा त्यांना ती देऊ नका. मग त्यांना तेथे काम करण्यासाठी जमीन भूसंपादन कायद्याप्रमाणे कार्यवाही करून संपादित करावी लागेल. त्यासाठी कायद्यानं तीन वर्षे लागतात. तोवर तुम्हाला प्रयल करता येतील...'

 सर्व्हेअरच्या मार्गदर्शनानं थोड़ी उमेद घेऊन महादू गावी परतला होता.

 त्या दिवसापासून तो वेड्यासारखा आपल्या शेतामध्ये वेळी - अवेळी काम असो - नसो चकरा मारत होता. जमिनीचा तसू तसू निरखून पाहात बसायचा. एक एक आंबा - डाळिंबाचं झाड हळुवारपणे पानाफुलांना स्पर्शत कुरवाळायचा. ही काळी आई आपणास पारखी तर होणार नाही ना? या विचारानं मन व डोकं जड व्हायचं त्याच्या गावातच नव्हे, तर सबंध तालुक्यात त्यावर्षी दुष्काळ जाहीर झाला होता आणि मोठ्या प्रमाणावर रिकाम्या हातांना काम आणि पोटाला अन्न मिळावे म्हणून रोजगार हमीची कामं सुरू करण्यात आली होती. शेजारच्या गावात बंडिंगचे एक काम चालू होतं, तिथं मजुरीही चांगली पडत होती. महादूच्या गावचे जवळपास साठ-सत्तर मजूर कामावर जात होते. त्यामुळे महादूची जमीन बुडीत क्षेत्रात जाणा-या पाझर तलावाच्या कामाला मागणी नव्हती. त्यामुळे महादू काहीसा निवांत होता.

 पण सुमारे दीड महिन्याने बंडिंगचं ते काम संपलं. त्या गावातलं पाणलोट क्षेत्रातलं पूर्ण काम झाल्यामुळे आता तिथं या हंगामात तरी काम निघणं शक्य नव्हते. त्यामुळे त्या गावचे व महादूच्या गावचे जवळपास सव्वाशे मजूर कामाअभावी बेकार बसून राहिले होते.

 याचा फायदा घेऊन दाजिबानं गावातलं पाझर तलावाचं मंजूर असलेले काम सुरू करावं, असा अर्ज तहसीलदारांकडे दिला. तेव्हा जमीन जाणा-या शेतक-याचा जमीन घेण्यासाठी संमती मिळवण्यासाठी तहसीलदाराच्या आदेशावरून तो उपअभियंता गावी आला, महादूसगट चार शेतक-यांची जमीन बुडीत क्षेत्रात जात होती. महादू वगळता इतरांनी दाजिबाच्या सांगण्यावरून व त्यांची थोडी थोडी जमीन जात

पाणी! पाणी!! / २२