पान:पाणी! पाणी!! (Pani ! Pani !!).pdf/39

हे पान प्रमाणित केलेले आहे.

 होय, मी बदललेय, माझं रूप बदललंय. हाडं चिवट झाली आहेत, शरीरात कष्टाची ताकद ठासून भरली आहे आणि त्याला वाट करून देण्यासाठी म्हणून तकलादू - श्रमाची आंच लागताच वितळणारं पोशीव मांस झडत गेलंय एवढंच... या नव्या हाडकलेल्या गजरेचा मला अभिमान वाटतो - ही मीच आहे, पण खुल्या आभाळाखाली मुक्त श्वास घेणारी - रोज दहा ते बारा रुपये कमवणारी एक उत्पादक स्त्री मजूर - कामगार !

 या... या सा-याचा मला अभिमान आहे...'

 आपल्याच विचारात नादावलेल्या गजराला भान आलं ते सासूच्या हाकेनं. ‘सूनबाई, उठलीस की नाही ? हा व्यंकू जागा झालाय - दूध मागतोय...'

 लगबगीनं गजरा बाहेर आली आणि दैनंदिन संसाराच्या कष्टाची चक्रे फिरू लागली... घरची सारी कामं आटोपली, तरी हणमंता घोरतच पडला होता. त्याला उठवावं, त्याचं चहापाणी करून द्यावं, असं मनात आलं, पण वेळ नव्हता. आणि त्याच्याकडे पाहताना पुन्हा एकदा एक दुरावा उफाळून आला. एका झटक्यात ती बाहेर पडली आणि लगबगीनं कामाकडे चालू लागली.

 पाझर तलावाचा निम्माअधिक बांध झाला होता. त्याच्याकडे पाहिलं की, गजराला अभिमान वाटायचा. जाणवायचं की, एक मजूर म्हणून याच्या उभारणीत माझेही श्रम सामील आहेत ! जेव्हा तो पूर्ण होऊन पाणी अडवला जाईल, तेव्हा या गावची बरीच जमीन बागायती होईल, विहिरींना पाणी वाढेल हळहळ एकच होती - बँकेनं लिलावात जो पाच एकराचा तुकडा विकला होता, तोही बागायत होत होता. पण आता त्याचा धनी वेगळा होता -

 त्यांच्या गप्पा रंगत असताना मुकादम त्यांच्या समोरून गेला, पण त्यानं गजराकडे पाहिलं न पाहिल्यासारखं केलं. इतर चार बाईमाणसांप्रमाणेच ती एक... त्याच्या लुब-या नजरेचा तिला तिटकारा होता, त्यामुळे त्याचं आजचं झालेलं दुर्लक्ष तिला दिलासा देऊन गेलं.. पण ते क्षणभरच.

 दुस-याच क्षणी सकाळपासून मनात उठलेल्या पिसाट विचारांना पुन्हा एकदा चालना मिळाली आणि ती मनस्वी घायाळ झाली...

 हा मुकादम जेव्हा गजरा प्रथमच या कामावर आली, तेव्हा कसा डोळे फाडून फाडून आरपार पाहात होता... ती किती भेदरली होती! अशा परक्या पुरुषाच्या नजरेची तिला अजिबात सवय नव्हती. हा आपला घाटदार देह, हणमंताच्या अभिलाषेचा विषय, एका परपुरुषाच्या नजरेत वासना पेरतो व लाळ गाळायला प्रवृत्त


बांधा / ३७