पान:पाणी! पाणी!! (Pani ! Pani !!).pdf/48

हे पान प्रमाणित केलेले आहे.

 कालची वृत्तपत्रे चाळत असतानाच टेलिफोनची रिंग वाजली, तेव्हा पडल्या पडल्याच हात लांबवून पलंगाच्या कडेला असलेल्या टेबलावरील फोनचा रिसीव्हर उचलला व ते जड स्वरात म्हणाले. 'हॅलो...'

 ‘सर कलेक्टर साहेब लाईनवर आहेत. शिंद्यांचा आळस क्षणार्धात उडाला. काही महत्त्वाचे काम असल्याखेरीज कलेक्टर सकाळी सकाळी घरी फोन करणार नाहीत, हे त्यांना ठाऊक असल्यामुळे ते ताडकन उठून बसले व म्हणाले 'जोडून दे.'

 खटकन् आवाज झाला, 'हॅलो चंद्रकांत?'

 ‘गुडमॉर्निग सर !” शिंद्यांनी आवाजात आदब आणीत अभिवादन केलं.

 'व्हॉट इज गुड़ इन धिस मॉर्निग, चंद्रकांत?'

 कलेक्टरांची रोखठोक स्वर कानी पडताच ते चमकले, सावध झाले. काहीतरी अघटित घडलंय, जे तहसीलदार असून आपल्याला माहिती नसावं किंवा आपण रिपोर्ट न केल्यामुळे इतर मार्गानी त्यांना काहीतरी समजलं असावं अन्यथा ते तसे शांत व खेळकर आहेत. पण आजचा नूर काही वेगळा दिसतोय. शिंद्याच्या मनाला एक अल्प भीतीची लहर स्पशून गेली.

 ‘पार्डन सर - माझं काही चुकलं का?' कलेक्टरांना काय म्हणायचं होते हें माहीत नसलं तरी नोकरशाहीच्या शिरस्त्याप्रमाणे वरिष्ठापुढे - आपली असलेली नसलेला चूक कबूल करत शिंदे हळुवारपणे आवाजात नसलेली नम्रता आणीत म्हणाले.

 'आजचा 'मराठवाडा' वाचला आहे',

 ‘नाही सर तो इथं दुपारी येतो चार नंतर -' शिंद्यांनी खुलासा केला, “काही विशेष सर?'

 ‘भयंकर आहे - तुमच्या तालुक्यात भूकबळी पडल्याची बातमी आहे समजलं !'

 आता कुठे कलेक्टराच्या तीक्ष्ण स्वराचे मर्म शिंद्यांच्या लक्षात आलं होत.महसूल खात्यात जरी ते नवीनच थेट तहसीलदार म्हणून लागले असले तरी खात्यासाठी भूकबळी पडणं ही किती नामुष्कीची गोष्ट आहे हे ते जाणून होते. यावर्षी पूर्ण जिल्ह्यात पावसाअभावी आवर्षण परिस्थिती होती, तर त्यांच्या तालुक्यात शासनानं मागच्याच आठवड्यात दुष्काळ जाहीर केला होता. रोजगार हमीची कामे फार मोठ्या प्रमाणावर सुरू होती, त्याच्या संदर्भात मजुरी - भ्रष्टाचाराच्या तक्रारी, धान्य कुपनावर धान्य न मिळणे किंवा जादा भाव लावणे इत्यादी तक्रारीही त्या प्रमाणात वाढल्या होत्या याखेरीज दररोज कुठल्याना कुठल्या गावातून नवीन कामाची मागणी येत होती. पुन्हा


पाणी! पाणी!! / ४६