पान:पाणी! पाणी!! (Pani ! Pani !!).pdf/51

हे पान प्रमाणित केलेले आहे.

  दुष्काळाशी सामना करताना उजाड खेडी, शुष्क रखरखीत प्रदेश पाहून त्यांना आपली सुस्थिती ही वाळवंटातील ओअॅसिसप्रमाणे वाटायची व ती मन विदीर्ण करून जायची. त्यामुळेच की काय ते अधिक तडफेनं व जिद्दीनं दुष्काळावर मात करायच्या विचारानं प्रेरीत होऊन काम करायचे.

 पण यातला तोकडेपणा व मर्यादा त्यांना प्रकर्षाने जाणवायच्या. अजस्त्र पसरलेल्या प्रशासनातले तहसीलदार म्हणून ते फार छोटे चक्र होते, जे त्यांच्यापेक्षा मोठ्या चक्रात व त्यांच्यापेक्षा लहान चक्रात गुंफले गेले होते, त्यामुळे स्वतःची गती राखता येत नव्हती.

 तसंच दुष्काळ पडला की टैंकरने पाणी द्यायचे, रोजगार हमीचं काम पुरवायचं, धान्य द्यायचं, हे उपाय दुष्काळाची तीव्रता कमी जरूर करणारे आहेत. पण त्यामुळे तो कायमचा हटत नव्हता. बहात्तरचा दुष्काळ ते फक्त ऐकून होते, पण त्यामानाने तीव्रता कमी आहे, असं अर्थशास्त्राचे विद्यार्थी असलेले शिंदे अनुमान जरूर काढू शकत होते. तरीही झालेले फार कमी आहे वे करायचं तर एवढे प्रचंड आहे की छाती दडपून जावी, या विचारानं ते बेचैनही व्हायचे.

 मागेपुढे कधी सवड मिळाली तर 'दुष्काळाचे अर्थशास्त्र व व्यावहारिक उपाययोजना' अशा त-हेचा विषय पीएच. डी. साठी घ्यायचा वे अधिक खोलात जाऊन त्याचा अभ्यास करायचा, अस त्यांनी मनोमन ठरवूनही टाकलं होतं.

 शिंद्याची विचारधारा थांबली ती भालेरावच्या येण्यामुळे, तहसीलदारांच्या चेंबरमध्ये येण्यापूर्वी ते आपल्या कार्यालयात गेले होते, तेव्हा कलेक्टर कचेरीचा वायरलेस नुकताच आला होता व तो वाचून आपल्याला कशासाठी तातडीने बोलावलंय याचा भालेरावांना अंदाज आला होता.

 'भालेराव, मघाशी कलेक्टर साहेबांचा फोन होता. काळगाव दिघीची एक महिला रोजगार हमीचं काम न मिळाल्यामुळे मरण पावली...'

 ‘आताच त्यासंबंधी वायरलेस आला आहे सर!' भालेराव म्हणाले, 'मी सोबत काम मागितलेल्या व्यक्तींची नावे असलेले रजिस्टर आणले आहे. त्यांनी रजिष्टर उघडीत एक एक पानं उलटायला सुरुवात केली.

 शिंदे अस्वस्थपणे पेपरवेटशी चाळा करीत होते. काही वेळानं भालेराव म्हणाले 'सर मागील आठवड्यात काळगाव दिघीच्या एका कुटुंबानं लेखी अर्ज करून कामाची मागणी केली होती. त्यांची नावे आहेत राघु ननावरे, त्याची पत्नी पारू व बहीण ठकूबाई - आणि वायरलेस मध्ये भूकबळी म्हणून ठकूबाईचं नाव आहे...!'


भूकबळी / ४९