पान:पाणी! पाणी!! (Pani ! Pani !!).pdf/55

हे पान प्रमाणित केलेले आहे.

जिंदगी बर्बाद झाली. समाजात पुन्हा विवाह होत असे पण तिची खचलेली कुडी व गेलेली रया पाहून कोणी तयार होत नव्हता. दोन मौसम प्रयत्न केल्यानंतर, राघूनं अलीकडे नाद सोडून दिला होता. बहिणीला माहेरी जन्मभर पोसावं एवढी काही त्याची ताकद नव्हती, तरीही तो व मैना जमेल तेवढं व तसे तिला सांभाळीत होते. पण तीही आपल्यापरीनं भार होऊन नये यासाठी कामाची पराकाष्ठा करायची.

 हे कठीण काम तिला झेपणार नाही, हे राघू व मैनेला पण ठकुबाईप्रमाणे समजत होतं. तिची मजुरीपण फार कमी पडत होती. तरीही ते चूप होते. कारण तेवढीच मजुरी प्रपंचाला मिळत होती व मुख्य म्हणज मजुरी कितीही असली तरी दररोज एक किलो गव्हाचे कुपन मिळत होते. त्यामुळे त्यांच्याकडे आता दोन क्विंटल गव्हाएवढे कुपन साचले होते. ते वटवून गहू घ्यायचा व तो बाजारात विकून पैका करायचा राघूचा बेत होता. कारण घरी गहू परवडणारा नव्हता व त्याला परत तेल णार होतं... ते त्यांना शक्यच नव्हतं.

 जोडरस्ता अवघ्या दीड किलोमीटरचा असल्यामुळे ते काम तीन आठवड्यात संपलं तेव्हा राघू तिघांचे कुपन एकत्र करून शेजारच्या गावात बोरसला गेला; पण ते दुकान मागच्याच आठवड्यात धान्याचा काळाबाजार केला असता तहसीलदारांनी रंगेहाथ पकडून निलंबित केलं होतं व ते गाव काळगावच्याच दुकानाला जोडलं होतं.

 सारा दिवस व चक्कर वाया गेली होती, पण राघूला त्याचं फारसं काही वाटले नव्हतं. कारण खेडेगावात रेशन दुकानं कधीच नीट चालत नाहीत, जावं तेव्हा उघडी असतातच असे नाही आणि उघडी असली तर धान्य कधी असतं, कधी नसतं. त्यामुळे आपल्या हक्काचंही धान्य नीटपणे वेळच्या वेळी मिळणं अवघडच होतं. हे सारं राधूला माहीत होतं. म्हणून तो निमूटपणे परत आला.

 पण काळगावचं रेशन दुकानाला कुलूप पाहिल्यावर मात्र त्याचा धीर खचला. घरातलं सारं धान्य व पैसा संपला होता. अक्षरशः दोन वेळा पोटात घासही जात नव्हता. रानात कुठेच काही काम नव्हतं. तेव्हा जाणकार ठकुबाईनं डोंगरमाथा हुडकून कसलातरी पाला तोडून आणला होता व दोन दिवस त्यावरच ते कुटुंब पोट भरत होतं.

 आज गहू मिळायला हवा होता, पण दुकान बंद. दुकानदार अचानक बालाजीच्या यात्रेला गेला होता व आठ दिवस येणार नव्हता. तेव्हा तो गावात सरपंच-पोलीस पाटलाच्या उंबऱ्याशी गेला व कुपन दाखवून त्यानं थोडे जोंधळे व बाजरी उसनी मागितली. सरपंच उर्मट होता. त्यानं भिकाऱ्याप्रमाणे राघूला हाकलून


भूकबळी ! ५३