पान:पाणी! पाणी!! (Pani ! Pani !!).pdf/59

हे पान प्रमाणित केलेले आहे.

जेवले नव्हते. कारण जंगली पाला उकडून खाल्ल्यामुळे पोट दुखत होते. चालण्याचे श्रम व अंगात मुरलेला ताप यामुळे एक एक पाय उचलणं तिच्या जीवावर येत होतं.

 आणि दोन - एक किलोमीटर अंतर त्यांनी जेमतेम कापलं असेल नसेल, साधी ठेच लागल्याचे निमित्त होऊन ठकुबाई अडखळून पडली आणि राघू मैना तिच्याकडे धावले. तिचं डोकं रस्त्यावरच मैनेनं आपल्या मांडीवर घेतलं, ठकुबाई नुस्ती तडफडत होती !

 'दादा, वयनी, लई तरास होतोय. म्या आता नाय जिंदा हात न्हाय आन् तेच बरं हाय म्या अशी कपाळकरंटी तुमास्नी भार!'

 ‘असं बोलू नये ठकुमाय, तू मह्या पाठची भण - आगं, जीवात जीव हाय तोवर म्या सांभाळीन तुला. आसं बोलू नये - जरा दम खा इथंच!' राघू कळवळून म्हणाला.

 जवळच एक वडाचं जंगली झाडं होतं, तिच्या सावलीत त्यानं व मैनानं तिला आधार देत आणलं व फडतरावर निजवलं, 'म्या पानी आनतो, जरा दम खा. ऊन कमी जालं म्हंजे निघू गावास्नी.'

 पाणी प्याल्यामुळे व विश्रांतीमुळे ठकुबाईचं कण्हणं जरा कमी झालं होतं; थोड्या वेळानं तिचा डोळा लागला. तिच्या बाजूलाच मैनाही जरा लवंडली राघू समोर खेळणा-या मुलांकडे लक्ष देत गुमान बसून राहिला.

 उन्हें उतरत होती तेव्हा मैना उठली आणि सहज म्हणून तिनं ठकुबाईच्या कपाळावर हात ठेवला, मघाशी चटके देणारं कपाळं आता थंडगार पडलं होतं. ती चरकली, तिच्या मनात भीतीची शंका उमटली व ती किंचाळली, ‘धनी, जरा इकडं या पगा, पगा - ननंदबाईचं कपाळ आक्षी थंडगार लागतंया,

 राघूनं पुढे होऊन ठकुबाईच्या कपाळावर हात ठेवला, तिचा हात हाती घेतला आणि गदगदून म्हटलं, 'कारभारणे, आपली ठकुमाय गेली - मेली गं...'

 तहसीलदार शिंदे सुन्न झाले होते. सकाळपासून त्यांना छळणारी टोचणी अधिक तीव्रतेने दंश करू लागली होती.

 राघू सांगतांना अडखळत होता, थांबत होता, एवढं एका वेळी प्रदीर्घ बोलायची त्याला सवय नव्हती. शब्द आठवत नव्हते आणि बहिणीच्या आठवणीनं तो गदगदून येत होता, पण डोळे कोरडे होते! नजर सुन्न होती...!

 'ऐकलंत ना रावसाहेब । - सरळ सरळ भूकबळीचा प्रकार नाहीतर काय आहे!' विसपुते म्हणाले, 'त्या दिवशी म्हणजे परवा एका पत्रकार मित्राला घेऊन मी

भूकबळी / ५७