पान:पाणी! पाणी!! (Pani ! Pani !!).pdf/71

हे पान प्रमाणित केलेले आहे.

 शकंरला जेव्हा आपली वहिनी कराडची आहे हे समजलं होतं, तेव्हा त्याच्या मनात हाच विचार तरळून गेला होता. आताही बोलताना सहज ते ओठातून बाहेर पडलं होतं.

 सदा पुन्हा खिन्न हसला - आपल्या साऱ्यांच्या बोलण्या - चालण्यात पाण्याचे संदर्भच ठासून भरलेले आहेत.

 सुनंदानं ते ऐकलं आणि तिच्या मनावर जो न समजणारा ताण मघापासून पडलेला जाणवत होता, त्याची दिशा स्पष्ट झाली होती.

 पुराणिकाची मुलगी आपण. बाबांनी पसंत केलेल्या मुलाचा गळ्यात डोळे झाकून माळ टाकली. पण तो प्राथमिक शिक्षक आहे. मॅट्रिक करून डी. एड. झाला आहे व बाहेरून बी. ए. करतो आहे, ही माहिती तिला सुखावून गेली होती. आठवीनंतर बाबांनी आपली शाळा बंद केली. नवऱ्याची मागेपुढे तालुक्याच्या गावी बदली झाली तर शिकताही येईल.. तो शिकवेल आपल्याला... ही कल्पनाच तिला बेहद्द आवडली होती व मनाला गुदगुल्या करून गेली होती.

 पण नवऱ्याच्या आकाशवाडीत पाण्याचे दुर्भिक्ष आहे, हे समजताच तिचा विरस झाला होता. जाणत्या वयापासून खळखळा वाहणारी कृष्णामाई तिची मैत्रीण होती. तिला या लग्नामुळे अंतरावं लागणार व अशा गावी जावं लागणार - जिथं सध्या पाणीटंचाईमुळे टैंकर चालू आहे - हे नवऱ्याच्या आपल्याशी व बाबाशी झालेल्या संभाषणात तिला समजून आलं होतं आणि मनावर ताण पडला होता.

 तो आता दिराच्या बोलण्यानं पुन्हा जास्तच ताणला गेला होता.

 ‘उगी भाबडी आशा आहे ही शंकरा.' सदा म्हणाला ‘पायगुण वगैरे झूट आहे - हा निसर्गाचा शाप आहे बाबा - आपलं गावच कमनशिबी आहे.'

 'बरं ते जाऊ दे. गावात तुझ्या शाळेचा बँड घेऊन गावची पोरं व इतर मंडळी स्वागताला सञ्ज आहेत!' शंकरनं माहिती पुरवली.

 “अरे, पण मी का पुढारी - अधिकारी आहे बँड वाजवून माझं स्वागत करायला? झालंच तर - लग्न करणं म्हणजे काही पराक्रम नाही. ती साऱ्यांचीच होतात.'


खडकात पाणी /६९