पान:पाणी! पाणी!! (Pani ! Pani !!).pdf/91

हे पान प्रमाणित केलेले आहे.

घेणे अवघड आहे; कारण तिथं रोजगार हमी शाखेत ओ.एस.डी. यंदे साहेब बसलेलेत. ते इथं असताना त्यांचा एका रोडचा भ्रष्टाचार भी शोधून काढला व आता ते प्रकरण क्वालिटी कंट्रोलकडे गेलंय त्यामुळे त्यांना रेग्युलर एस. ई. चा चार्ज न मिळता ही साईड पोस्ट मिळाली. त्यांची माझ्यावर खुन्नस आहे. ते सरळपणे कामे मंजूर करणार नाहीत....'

 'तो यंद्या होय, महाचालू ! मी त्याला सरळ करतो.' बप्पा त्यांच्या नेहमीच्या भाषेत गरजले, 'त्यांच्याकडे कामं तरी पाठवा.'

 'मी मागच्या आठवड्यातच पाठवली आहेत. मरखेल पॉकेटमधील दोन नॉन प्लान रोडचे काम जस्टिफिकेशन देऊन पाठवलंय.' मी म्हणालो, 'आज - उद्या कळायला हवं!”

 त्याच वेळी आमची पेशकार लोणीकर हातात एक फाईल घेऊन आला व म्हणाला, 'सर, आत्ताच कमिशनर ऑफिसचं टपाल आलं आहे व मरखेल पॉकेट मधील आपण सादर केलेली दोन्ही नॉन प्लान रोडची कामं ओ. एस. डी. यंदे साहेबांनी 'ऑब्जेक्शन’ लावून परत केली आहेत.'

 'काय ऑब्जेक्शन घेतली आहेत त्यांनी.'

 'मरखेलच्या प्रकरणात स्टे उठविण्याचा प्रयत्न करावा व तेथे दोन वनीकरणाची कामे मंजूर आहेत, ती चालू असताना अजून दोन रोडची कामे कशाला पाहिजेत याचे परिपूर्ण स्पष्टीकरण द्यावे....'

 मी बप्पाकडे वळून म्हणालो, 'पाहिलंत बप्पा, हा मार्गही अवघड झालाय. कलेक्टरांनी बोललं पाहिजे साहेबांशी.'

 ‘मग त्यांना सांगा तसं. मीही बोलतो, बप्पा म्हणाले, 'सांगा ऑपरेटरला फोन जोडून द्यायला.'

 ‘बप्पा, त्यातही अडचण आहे. कमिशनर साहेब एक महिन्याच्या ट्रेनिंगला आज - उद्याच जाणार आहेत इंग्लंडला व या काळात जिल्हाधिकारी औरंगाबादकडे चार्ज राहणार आहे व ते ही रिस्क घेतील का हा खरा प्रश्न आहे. पुन्हा आमचे भावे साहेब त्यांना सीनियर आहेत, ते विनंती करतील असं वाटत नाही.'

 'च्या मारी ! हें भलतंच त्रांगडे होऊन की हो बसलं.' बप्पा म्हणाले, 'पण दादा म्हणाला ते खरं आहे नियम है माणसासाठी आहेत, माणूस नियमासाठी नाही.

हमी? कसली हमी? / ८९