पान:पाणी! पाणी!! (Pani ! Pani !!).pdf/93

हे पान प्रमाणित केलेले आहे.

 पण इथल्याच पातळीवर रोडची कामे मंजूर करुन ती कार्योत्तर मंजुरीसाठीच पाठविणे, हाच एक मार्ग दिसत होता. अन्यथा लोकांची कामाची मागणी, वाढते दडपण व त्यातून उफाळणारा असंतोष कोणते रूप धारण करील हे सांगणं कठीण होतं.

 मला मात्र राहून राहून जालन्याच्या जाधवांची आठयण येत होती. ते कांही वर्षापूर्वी तिथं उपजिल्हाधिकारी (रोजगार हमी योजना) होते. वनीकरणाच्या कामात त्या खात्यानं रोपे न लावता लावली असं दाखवून बराच भ्रष्टाचार केला होता. हा प्रश्न बप्पांनी विधानसभेत गाजवला. वनखात्याच्या अधिका-यांना तर घरी जावं लागलंच, पण जाधवांनी नीट तपासणी न करता त्या विभागाला रोजगार हमी निधीचे पैसे दिले म्हणून त्यांनाही शासनानं सस्पेंड केलं. अर्थातच पुढे त्यांनी हायकोर्टातून स्टे आपल्यामुळे ते कामावर राहिले. पण मनस्ताप व्हायचा तो झालाच. मला एकदा ते संतापानं उद्विग्न होत म्हणाले होते,

 'देशमुख, पैसे खाल्ले ते वन खात्याच्या ऑफिसरनी. मी फक्त क्रेडिट लिमिट रिलीज केली. तीही कलेक्टरांच्या मंजुरीनं. दोषी असू तर दोघेही ना! मला विनाकारण सस्पेंड केलं, कलेक्टरांना मात्र हात लावायची शासनाची हिंमत झाली नाही... कारण ते आय. ए. एस. ना... तोंडात सोन्याचा चमचा घेऊन पैदा झालेले. साली गव्हर्नमेंट गांडू- त्यांना टरकते, मला तर आता वाटतं, आय. ए. एस. म्हणजे इंडियन अॅडमिनिस्ट्रेटिक सर्व्हिस नाही, तर आय अॅम सेफ किंवा आपले निर्वाचन आयुक्त शेषन म्हणतात तसे 'आय अॅम सॉरी...' काम न करता फक्त सॉरी म्हणायचं बस्....."

 जाधवांचे ते बोल माझ्या कानात घुमत होते आणि माझं मन बप्पांचा सल्ला अमलात आणायला कचरत होते. पुन्हा रोजगार हमी विभागाचे काम करणे राष्ट्रपती जसे घटनाप्रमुख असूनही प्रत्यक्षात त्यांच्या हाती सत्ता नसते, ती असते पंतप्रधानांकडे- तसा प्रकार, कामाची मंजुरी आम्ही द्यायची, पण प्रत्यक्ष कामाचे सर्वेक्षण व काम करण्याचे अधिकार विविध यंत्रणांना, उदा. कार्यकारी अभियंता, वनाधिकारी किंवा मृदसंधारण अधिकारी इत्यादींना. ही मंडळी फिल्डवर दररोज काय करते हें आम्ही पहाणार कसं? त्यामुळे रिस्क घेऊन योजनाबाह्य कामे मंजूर करावीत व रोजगार पुरवावा असं उदात्त विचारानं ठरवलं तरी ही कार्यकारी यंत्रणा त्याच भावनेने व तत्परतेने काम करील याचा काय भरवसा? पुन्हा बळीचे बकरे आम्हीच ठरू, ही जास्तीची शक्यता !

 माझा मनाची सारखी चलबिचल होत होती, त्यामुळे काय करावं हा निर्णय होत नव्हता.... गुंता वाढत होता, तिढा बसत होता.

हमी? कसली हमी? / ९१