या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

होईल. या स्वप्नांनी कम्युनिस्ट भारावलेले होते. आजही कम्युनिस्ट कलावंत याच स्वप्नांनी भारावलेला असतो. हे स्वप्न साकार करण्यासाठी आपली कविता शस्त्राप्रमाणे वापरण्याची त्याची प्रतिज्ञा असते.मार्क्सवादी वाङ्मयाला वर्गसंघर्षांच्या लढ्यातील हत्यारच मानतात. पण सुर्व्यांमधील कवी मी ते स्वप्न साकार करण्यासाठी कविता राबवीन असे म्हणत नाही. तो म्हणतो, जेव्हा हे स्वप्न साकार होईल त्यावेळी मी त्याचे स्वागत करीन. हा विजय जीवनाच्या महाद्वारातून मिरवत येत असताना खरेखुरे स्वातंत्र्य आले हे कळल्यानंतर जीवनाला नवा अर्थ मिळेल. माझी कविता वेडी होऊन नाचू लागेल. हा विजय घेऊन येणारे विचारतील, जेव्हा अंधार होता तेव्हा त्या अंधारात जो पहाट शोधीत होता, तो पहाट शोधणारा आहे तरी कुठे ? म्हणून त्यांच्या ओळखीचे सूर जपून ठेवले पाहिजेत. हा विजय अमुकच मार्गानी यावा असा कवीचा आग्रह नाही.
 विविध राजकीय तत्त्वज्ञाने या भयमुक्त स्वतंत्र जगाचे स्वप्न पाहत आहेत. ते अमेरिकेतील लोकशाहीवाद्यांनी पाहिले आहे, रशियातील मार्क्सवाद्यांनी पाहिले आहे. लोकशाही समाजवाद्यांनी आणि भारतातील गांधीवाद्यांनीही हे स्वप्न पाहिले आहे. हे स्वप्न कोण साकार करील, कसे साकार करील, हा कवीचा प्रश्न नाही. हे स्वप्न साकार व्हावे इतकीच त्याची इच्छा आहे. हे स्वप्न साकार करण्यासाठी कवी प्रयत्न करणार नाही. माणसे प्रयत्न करतील. हे स्वप्न साकार होईपर्यंत अश्रू जपण्याचे काम कवीचे आहे. जेव्हा हे स्वप्न साकार होईल, तेव्हा स्वागताचे काम कवीचे आहे. म्हणून सुर्व्यांमधील कवी म्हणतो- 'खळ्यातून, मळ्यातून, ताऱ्यातून, वाऱ्यातून याने कुठुनही यावे । रस्ते मोकळेच ठेवलेत !' या अशा कवितेच्या शेवटी जेव्हा मुठी वळलेल्या हातांचा उल्लेख असतो, तेव्हा तो क्रांतीचा उल्लेख नसतो. क्रांती यापूर्वीच झालेली आहे. विजयही झालेला आहे. हा विजय खांद्यांवरून मिरवीत आणणे चालले आहे. तेव्हा आता क्रांती व्हावयाची उरली नाही. या विजेत्यांना कवी ज्याप्रमाणे सर्व वाटा मोकळ्या आहेत म्हणून सांगतो, कुठूनही यावे असे आमंत्रण देतो, त्याचप्रमाणे घराघरात मुठी वळलेले हात आहेत म्हणून सांगतो. मुठी वळलेले हात कवीच्या मते कारखान्यांत नाहीत. ते केवळ शहरांत नाहीत. माझ्या देशात गावोगावी, शहरोशहरी, धराघरांत मुठी वळलेले हात आहेत असे कवी म्हणतो. उघडच हे हात कम्युनिस्ट पार्टीच्या कामगारमोर्चाचे असणार नाहीत. ज्यांचे भविष्य अजून उमलावयाचे आहे त्या सर्व नव्या पिढीचे, बालकांचे हे मुठी वळलेले हात आहेत. कवी हा विजय होण्यापूर्वीचा आहे. त्याचा जन्म भाकरीचा चंद्र शोधण्यात निघून जातो. पण या मुठी वळलेल्या हातांच्या भविष्यरेखा विजयानंतर उजेडात येतील. तिथून माणसाचा माणूस म्हणून विकास सुरू होतो. नारायण सुर्वे हा माणूस कम्युनिस्ट आहे, ह्या एका जाणिवने या कवितेवर किती अन्याय झालेला आहे, याची काही कल्पना आता येईल. खरे म्हणजे ही कवितासुद्धा साधी आशावादी कविता आहे.

 यापेक्षा 'गाणे' या कवितेचे स्वरूप निराळे नाही. 'भरल्या पोटाने अगा पाहतो

१२२ पायवाट