या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

उपाशीपोटी संसारच नसतो असे नाही. त्याला धुंदी नसते असे नाही. वेतल्या जीवनातील अंधाऱ्या कोठडीतसुद्धा ओठ खडीसाखर होत जातात हा सुर्व्यांचाच अनुभव आहे. माझे गाणे तुमच्या गाण्यापेक्षा निराळे आहे, कारण माझे जीवन तुमच्या जीवनापेक्षा निराळे आहे. माझा अनुभव तुमच्या अनुभवापेक्षा निराळा आहे; कारण आम्ही चंद्र उपाशीपोटी पाहिला आहे असे कवीला म्हणायचे आहे.
 जे जीवनात खूपच दुःख भोगतात, त्यांच्यासमोर दुःख हेच एक शाश्वत सत्य म्हणून उभे राहते. ते दुःख भोगतात म्हणून कवी होत नाहीत, तर कवीही असतात आणि दुःखही भोगतात; म्हणून ही व्यथा ते कवितेच्या पातळीवर नेतात. सगळेच कवी उपाशी नसतात. सगळेच उपाशी कवी नसतात. पण जो कवीही असतो आणि उपाशीही असतो, त्याची कविता निराळी होते. अगा माझे गाणे निराळे आहे. कारण चंद्र पाहण्याची शक्ती ही जरी माझ्यात असली तरी चंद्र पाहतानाची अवस्था निराळी आहे, असे कवीला म्हणायचे आहे. सुर्व्यांची कविता भुकेच्या शमनार्थ भीक मागणारी कविता नाही. तर भुकेचे गाठोडे खांद्यावर वाहून नेताना तिथेही आत्म्याशी बेइमान न होता माणुसकीची कळ जपणारी कविता आहे. व्यथा हे त्या कवितेचे मुख्य स्वरूप आहे. आणि व्यथेच्या भट्टीत शेकन घेऊनही शिल्लक राहिलेला माणूस हा या कवितेचा विषय आहे. प्रकृतीच्या विरोधात संस्कृती टिकत नाही, हे कम्युनिस्टांचे तत्त्वज्ञान आहे. प्रकृतीच्या विरोधातून संस्कृती टिकते असे कोण्याही आधुनिकाने म्हटले नाही. सगळे मानसशास्त्र प्रकृतीची सोय लावीतच संस्कृतीला आधार शोधीत असते. सगळे समाजशास्त्रही हाच मुद्दा सांगत असते. कुठे चिंतनाचा विषय काम असेल, कुठे चिंतनाचा विषय क्षुधा असेल. या दोन सहजप्रेरणांची प्रकृतीही बलवान आहे. त्यांची विकृतीही तितकीच बलवान आहे. कारण या प्राकृतिक सहजप्रेरणा आहेत. सामाजिक दृष्टीने पाहिले तर माणूस अन्नाशिवाय जगू शकणार नाही. अन्न मिळण्यासाठी माणूस वाटेल ते पाप करील, हे एक सत्य आहे. आणि वैयक्तिक दृष्टीने पाहिले तर समोर आलेल्या अन्नाचा अव्हेर करून मरणाच्या दारात जिद्दीने जाण्याची ताकद फक्त माणसातच असते, हे दुसरे सत्य आहे. ते दुसरे सत्य व्यक्तिगत जीवनात प्रकृतीवर मात करणाऱ्या संस्कृतीचा विजय दाखवीत असते. सुर्व्यांची कविता ही या संकृतीची कविता आहे. म्हणून हा कवी भाकरीचा चंद्र शोधण्यात अर्धे आयुष्य बरबाद झाले तरी स्वतःचा शोध घेण्याचे थांबवीत नाही, त्याची आत्म्याशी चाललेली चर्चा कधीच संपू शकत नाही. हा कवी ज्या वेळेला आम्ही भरल्यापोटाने चंद्र पाहिला नाही म्हणून सांगू लागतो, त्यावेळी तो कवित्व हा फुरसतीचा व्यापार मानीत नसतो. कारण त्यानेच सर्व वादळांत ही ज्योत जपून ठेवलेली असते. तो फक्त अशा वेळी माझे गाणे तुमच्यापेक्षा निराळे आहे इतकेच सांगत असतो. हे कळण्यासाठी नुसते चिकित्सक असून चालत नाही, तर रसिक हृदयही असावे लागते.

 कोणाही कवीचे कवितेतील आत्मनिवेदन म्हणजे वास्तवातल्या माणसाचे आत्मचरित्र नव्हे ही पहिली बाब. आगि अशा आत्मनिवेदनातून एखादे सुसंगत तत्त्वज्ञान

१२४ पायवाट