या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

समोर डोळे उघडे ठेवण्याशिवाय दुसरा मार्ग नसतो.
 सुर्व्यांच्या कवितेत दोष नाहीत असा याचा अर्थ नाही. सुर्व्यांच्या कवितेत दोष आहेत, तशा या कवितेला मर्यादाही आहेत. सुर्व्यांच्या कवितेला जे वेगळेपण लाभलेले आहे, ते निर्दोष असण्याचे नाही. ते जिवंत असण्याचे वेगळेपण आहे. जिवंत आणि उत्कट अनुभव घेऊन फक्त त्याच अनुभवावर उभ्या असलेल्या या कवितेने स्वतःची नवी भाषा निर्माण केली आहे, तशी स्वतःची नवी प्रतिमासृष्टी उभी केली आहे. जो वर्ग अजून कवितेत मुका होता, तो वर्ग सर्व कणखरपणानिशी या कवितेने साकार केला आहे. या धडपडीतूनच या कवितेच्या मर्यादा आणि दोष जन्माला येतात. अनुभवाच्या अंतर्गत लयीखेरीज रचनेच्या दुसऱ्या कोणत्या लयीला शरण जायचे नाही, असे म्हटल्यानंतर ही कविता गद्याच्या अगदी जवळ जाते, आणि अनुभवाचा एक ताण कमी पडला, कुठे थोडा तोल ढासळला, की लगेच तिचे गद्य व्याख्यान होऊन जाते. 'माझे विद्यापीट' वाचताना हे जाणवत नाही, पण ' मुंबई' वाचताना हे जाणवल्याशिवाय राहात नाही.
 खरे म्हणजे दोन्ही कविता एकमेकांशी अगदी मिळत्याजुळत्या आहेत. फक्त 'माझे विद्यापीठ 'मध्ये कुठल्याही सूत्राला बांधून न घेणारा माणूस उभा आहे. 'मुंबई' या कवितेत आम्ही कामगार या मुंबईचे सौंदर्य घडवतो, या सूत्राला कवीने मधूनमधून बांधून घेतले आहे. हीही कविता अतिशय जिवंत आणि प्रभावी, तितक्याच उत्कट अशा आपल्या कहाणीपासून सुरू होते आणि हा ताण टिकवीत वाढत जाते. या समुद्रकिनाऱ्यावर माझा बाप मेला आणि साच्यावर मी कामाला लागलो, या भयानक सत्यापर्यंत कोणताही नाटकीपणा न करता ही कविता आपणाला घेऊन जाते. पण क्रमाने कवी भोवतालच्या घटनांचे आपल्या मनावर संस्कार काय झाले हे सांगणे थांबवून कामगारांचे महत्त्व काय आहे हे सांगू लागतो. त्या ठिकाणी अनुभवाचे ताण निघून जातात आणि प्रचाराचे भूस इकडेतिकडे विस्कळितपणे उडू लागते. सुर्व्यांच्या कवितेत हे घडणे टाळता येण्याजोगे नाही. कला आणि कारागिरी, कला आणि प्रचार यांच्या सीमारेषा जे लीलया सांभाळीत असतात, त्यांना ते सांभाळणे जसे जमते तसे भान विसरून लढणाऱ्यांना रेघांच्या मर्यादा सांभाळणे जमण्याचा संभव नसतो. ज्या गुणातून सुर्व्यांच्या कवितांचे सामर्थ्य निर्माण होते, तो घटकच पाहतापाहता सुर्व्यांच्या कवितेवर मात करतो. सगळी कविताच खाऊन टाकतो.

 कवीवर आणि कलावंतावर त्याच व्यक्तिमत्त्वामधील माणसाची मात हा अशा कवितेचा सगळ्यात मोठा धोका असतो. कवीचा प्रांत संपतो केव्हा आणि माणसाचा प्रांत सुरू होतो केन्हा, हे सांगणे फार कठीण आहे. कारण अनुभवाचा प्रामाणिकपणा हेच ज्यांचे भांडवल असते, त्यांच्या ओव्या कुठे संपतात आणि शिव्या कुठे सुरू होतात हे त्यांचे त्यांनाही समजत नाही. सुर्व्यांच्या कवितेला हीच एक मर्यादा आहे असे नाही. त्या कवितेला अजूनही फार मोठ्या मर्यादा आहेत. इंद्रियांच्या संवेदनाक्षमतेमुळे निर्माण होणाऱ्या रंग, गंध, स्पर्शाच्या सूक्ष्म जाणिवांपासून ही कविता दूरच राहते. जे अनुभव

१३८ पायवाट