या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

स्वाभाविक गोष्ट आहे. ती अनुभवाच्या प्रामाणिकपणाची खूण आहे. मराठीतील अनेक कलावाद्यांच्या लिखाणात गृहीत असलेली ही जीवनवादी भूमिका आहे. कलावादी समीक्षकांना असे वाटते, की अनुभवाशी प्रामाणिक राहण्याचा हवाला दिल्यामुळे आपण कलावादी भूमिका सांगतो आहोत. अनेकजण असे सांगतात की, आजच्या जगात माणूस स्वतःच्या व्यक्तिमत्त्वालाच पारखा झाला आहे. स्वतःलाच हरवून बसला आहे. आपण जगत असलेल्या जगातच तो नवखा आणि तिन्हाईत झाला आहे. या जगात मूल्यांना कोणता अर्थच उरलेला नाही. सर्वच मूल्यांची सार्वत्रिक पडझड चालू आहे. त्यातून माणूस अश्रद्ध व विफल होतो आहे. ही त्याची अगतिकता, अश्रद्धा व विफलता वाङ्मयात प्रतिबिंबित होते आहे. पुन्हा एकदा ही जीवनवादी भूमिका आहे. काहीजण म्हणतात, हे जडजगत मूल्यशून्यच आहे. सगळीच मूल्ये संस्कृतीने निर्माण करून जगावर लादलेली आहेत. जीवनाच्या गतिविधीत मूल्यांना जागाच नाही. मुल्यांना या जगात स्थान आहे असे मानणे हीच एक 'अॅबसर्डिटी' आहे, तिचे आम्ही चित्रण करीत आहोत. ही पुन्हा जीवनवादी भूमिका आहे.
 गेल्या दहा वर्षांतील मराठी ललित वाङ्मय हे पुन्हा एकदा जीवनवादी भूमिकेकडे वळत आहे. नुसती नारायण सुर्वे यांची कविताच जीवनवादी भूमिका घेते आहे असे नाही, तर त्याच बाजूने दिलीप चित्रे यांची कवितासुद्धा वळते आहे. दिलीप चित्रे जीवनाची बांधिलकी मानायला तयार नसतील तर ठीक आहे. ही जबाबदारी स्वीकारायची की नाही त्याबाबतचे त्यांचे स्वातंत्र्य आपण मान्य करू. पण त्यांना जे जीवन दिसते आणि जाणवते, ते रंगविण्याचा त्यांचा आग्रह आहे. याला दिलीप चित्रे किंवा भाऊ पाध्ये यांचा इलाज नसतो. कलावंत जे जाणवते तेच लिहू शकतो. जे जाणवतच नाही ते लिहू शकणार नाही. जीवनवादी भूमिकेचे अर्धे सामर्थ्य या ठिकाणी असते.
 सध्या सद्दी चालू आहे ऐतिहासिक कादंबऱ्यांची आणि नाटकांची. जे एकेकाळी सांगत होते की, सबंध समाज सडलेला आहे, या सडलेल्या आणि किडलेल्या समाजाच्यामागे असणारे जे मानवी मन आहे, त्याचे सूक्ष्म विश्लेषण करणे यातच कलांची अंतिम सार्थकता आहे, व ह्या भूमिकेविषयी ज्यांचा आग्रह होता, ती माणसेसुद्धा जुन्या जमान्यातील एखादा राजकीय नेता घेऊन त्यावर चरित्रपर कादंबरी लिहिता येते काय याचा शोध घेत आहेत. अशी चरित्रपर कादंबरी लिहून आपण नवी परंपरा निर्माण करतो आहोत, असाही आता आग्रह चालू आहे. ऐतिहासिक चरित्रपर कादंबरी लिहिण्याची प्रेरणा एकच असू शकते. मग हा इतिहास पन्नास वर्षांपूर्वीचा असो की पाचशे वर्षांपूर्वीचा असो. तुम्ही शिवाजीवर लिहा की लोकमान्य टिळकांवर आणि गांधीजींवर लिहा. तुम्हांला हे म्हणणे भाग आहे की, जीवनात जे चांगले आहे त्याची मी पूजा बांधतो आहे. किंवा तुम्हांला असे म्हणणे भाग आहे की, जे जीवनात वाईट आहे त्याचा मी तीव्र निषेध करीत आहे. या नवयुगप्रवर्तनाचे नेतृत्व नवकथेच्या निर्मात्याचे आहे ही त्यांतली लक्षणीय बाब आहे.

 जे घडले आहे त्याबद्दल मी दोष देत नाही. 'किडलेली माणसे' लिहिणारे

१७८ पायवाट