हे पान प्रमाणित केलेले आहे.

अवाढव्य धुंडिराज होतात ही गोडसे यांची तक्रार आहे. एकतर यानंतरच्या काळातील कैलास लेणे व कारले येथील गुंफेतील किंवा घारापुरीतील शिल्प या भूमिकेप्रमाणे निर्जीव, सांकेतिक मानले पाहिजे. ते गोडसे यांना मान्य नाही. घारापुरी व कैलास येथील शिल्पांत सळाळणारा जिवंतपणा आढळतो असे त्यांना वाटते. पण हे सर्व शिल्प सातव्या-आठव्या शतकातील आहे. गोडसे यांच्या मते हा काळ विलगीकरणाचा आहे. या विलगीकरणाच्या अधिक अधःपतित काळात हा सळसळणारा जिवंतपणा आला कोठून ? एकतर त्रिमूता शिल्प नकली, निर्जीव, हिणकस मानले पाहिजे. कैलासाचीही तीच व्यवस्था लावली पाहिजे. किंवा दुसरे तर आठव्या शतकात नव्या जाणिवांचा वस्तुनिष्ठ काळ सांगितला पाहिजे. असे म्हटले म्हणजे भरहूतप्रमाणे कैलास, भासाप्रमाणे राजशेखर अगर माघ नव्या वस्तुनिष्ठ काळाचे प्रतिनिधी मानले पाहिजेत. तिसरा मार्ग गोडसेप्रणीत भूमिकेला पुरावा नाही हे मान्य करण्याचा आहे. भारतीय कलांच्या इतिहासातील एक वस्तुस्थिती अशी आहे की वास्तुकलेचा विकास क्रमाने नवव्या शतकापासून तेराव्या शतकापर्यंत दिसतो व धातुमूर्तीचा कालखंड बाराव्या-तेराव्या शतकात वैभवाला पोहोचतो. या मंदिरांतील शिल्पे व या धातुमूर्ती आठव्या शतकातील शिल्पापेक्षा फारशा निराळ्या नाहीत. याही घटनेचा उलगडा निर्जीव जीवनाच्या संदर्भात करून दाखविता आलाच पाहिजे. अजिंटा येथे सहाव्या शतकातील फक्त छदंत जातकच आहे काय ? राहुलला पोटाशी धरून सर्वस्वदानासाठी दरवाज्यात उभी राहिलेली यशोधरा व अजिंठ्यात चित्रिलेली प्राण्यांच्या झुंजीची चित्रे, या सहाव्या-सातव्या शतकातील एकूण चित्रांना जोपर्यंत गोडसे यांचे विवेचन स्थूलपणे लागू होत नाही, तोपर्यंत पुराव्याने सिद्ध झालेले मत म्हणून त्यांचे विधान स्वीकारता येणे कठीण आहे.

 भरहूत येथील शिल्याचा गोडसे यांनी लावलेला अर्थ तरी कुठवर बरोबर आहे हा प्रश्न चर्चेचाच आहे. गोडसे यांच्या भूमिकेप्रमाणे धाकटी राणी सुभद्रा मत्सराने प्रेरित झाली व तिने छदंताचा वध करविला, ही कथा भरहूतला कोरलेली आहे. त्यांच्या स्पष्टीकरणाप्रमाणे सोणुत्तर छदंताचा वध करतो व मृत छदंताचे सुळे कापून घेतो, यामुळे त्यांना शिकारी हा जेता वाटतो. हे सारे स्पष्टीकरण स्वीकारण्यापूर्वी भरहूत येथील एकूण शिल्याचे स्वरूप लक्षात घेतले पाहिजे. ते संपूर्णपणे बौद्ध धर्माशी निगडित आहे. जातककथांत आलेली छदंताची कथाच फक्त भरहूत येथे नाही. तेथील शिल्पात महाकपी-जातक आहे तसे कुक्कटजातक आहे. इतरही जातककथा तिथे चित्रित केलेल्या आहेत. झोपलेल्या मायादेवीला स्वप्नात हत्ती दिसतो. ही भविष्यवाणीही भरहूतच्या शिल्पकारांना ज्ञात आहे. अशा परिस्थितीत भरहतला छदंताचे शिल्यांकन करताना कलाकारांची भूमिका आपण बोधिसत्त्वाचे चित्रण करतो अशीच आहे. आजच्या उपलब्ध जातककथेत छदंत हिमालयात राहत होता. एका प्रचंड वटवृक्षाशेजारी असलेल्या कांचनगुहेत तो राहत होता असा उल्लेख आहे. 'छदंत आणि वटवृक्ष' हा सांधा बौद्धांचा आहे व तो भरहूतपूर्वकालीन आहे. कारण वटवृक्ष हाच अनेकदा 'तथागतां'चे प्रतीक म्हणून दाखविला

पोत ३५