या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

कार्य उच्च, सात्त्विक आनंद देण्याचे आहे हे म्हणून झाल्यानंतर जर आपण अतृप्त वासना पूर्ण करण्याच्या, जीवनाच्या कंटाळवाणेपणातून विरंगुळा देण्याच्या व वाचकांची उत्कंठा सतत वाढविण्याच्या कार्यासाठी कलेने काय करावे याचाच विचार करणार असू, तर मग या सगळ्या ठिकाणी 'आनंद' हा शब्दच 'मनोरंजन' या अर्थाचा होऊन जातो. असे होणे वा.लं.ना मान्य नाही. आणि म्हणून जीवनाच्या अवलोकनावर, निरीक्षणावर भर देणारी, पण जीवनाच्या आकलनाबद्दल जीवनाच्या अंतःप्रवाहाच्या संदर्भात एखाद्या घटनेची संगती व स्थान पाहण्याबद्दल मूक असणारी वाङ्मयीन दृष्टी त्यांना कधीच पटू शकणार नाही. कलेचा उगम जीवनातून होतो ही गोष्ट फडके यांनाही अमान्य नव्हती. कलावंताला जीवनाचे मार्मिक अवलोकन करावे लागते हे तेही सांगत. पण हे सगळे अवलोकन करायचे कशासाठी १ जीवनातील वास्तवाचा हुबेहूब भास निर्माण करून वाचकांची मने जिंकावी, त्यांना कल्पनेच्या सृष्टीत नेऊन सोडावे व त्यांना विरंगुळा द्यावा यासाठी हा उद्योग असेल, तर या कलावादाशी वा.लं.चे पटणे कधी शक्य नाही. प्रा. फडके अक्षर व अक्षय भावनांच्याविषयी खूपच बोलत असतात. जणू वाङ्मयात अक्षर भावना रंगविणारे वाङ्मय व विनाशी भावना रंगविणारे वाङ्मय असे दोन गट पडतात ! या विनाशी भावना आणावयाच्या कुटून ? भांडवलदाराचा द्वेष करणारा कामगार दाखवला तरी द्वेष ही भावना अक्षरच असणार. भावना नेहमी अक्षरच असतात, आणि त्या नेहमी मर्त्य घटनांतूनच प्रकट होत असतात. त्या प्रकट होणे महत्त्वाचे असते. त्या घटना महत्त्वाच्या नसतात. पण भावना ही अशी कोणती वस्तू आहे काय की जिचा स्वतंत्र विचार करता येईल ? मी राग रंगवतो या वाक्याला काही अर्थ आहे काय ? कारण प्रत्येकाचा राग निराळा असणार. तो राग येण्याची कारणे, रागाचे प्रसंग, रागावणारा माणूस, त्याला आलेला राग-- ही सारी वाङ्मयात एकजीव होऊन प्रकट झाली पाहिजेत. भावना काहीतरी वेगळी असते, 'काय ' सांगितले हे वेगळे असूनही कलेत महत्त्वाचे नसते, त्यापेक्षा 'कसे' सांगितले ही अगदीच वेगळी बाब महत्त्वाची असते- ही रंजनवाद्यांची द्वैती भूमिका वा.लं.ना कधीच मान्य नव्हती. म्हणून वा.ल. कलावादी असले तरी तंत्रवादी होऊ शकत नाहीत.

 फडके यांची भूमिका एका विशिष्ट पद्धतीने तंत्रवादी आहे, तर दुसऱ्या एका विशिष्ट पद्धतीने मढेकरांची भूमिकाही तंत्रवादीच आहे. ललित कलाकृतीत परिवर्तनशील अर्थाचे शब्द, अपरिवर्तनशील अर्थाचे शब्द अशी विभागणी प्रथम करायची, त्यानंतर एकेका शब्दामुळे सुसंगती कुठे आहे, विरोध कुठे आहे, समतोल कसा आहे हे नोंदवीत बसायचे व पूर्वसिद्ध ठरीव सौंदर्यतत्त्वांनी ही आकृती सुंदर कशी ठरते हे दाखवून द्यायचे, मात्र त्यातून कलावंत काय व्यक्त करू पाहतो या गोष्टीकडे कानाडोळा करायचा ही वाङ्मयदृष्टी वा.लं.ना तांत्रिकच वाटते. तशी तक्रार त्यांनी 'साहित्य आणि समीक्षे'च्या वेचाळीस-त्रेचाळिसाव्या पृष्ठांवर केली आहे. मढेकरांच्या वाङ्मय-विवेचनातील हा तंत्रवाद सामान्यत्वे लक्षात येणारा नाही. पण एकदा सौंदर्य वस्तुनिष्ठ मानल्यानंतर समीक्षेचे

वा. ल. कुलकर्णी : एक समीक्षक ५१