या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

असून चालणार नाही. तसा तो आहे, हा विचार वा.लं.नीच मांडला. कंकभट गोखले नसून गांधी आहे, सैरंध्री ही पीडित भारतमाता नसून खरी क्रांतिदेवता आहे, व भीम मात्र पोकळ आहे. प्रत्येक नाटकाचा प्रकार वेगळा असतो. खाडिलकरांच्या गंभीर विचारनाट्याला लागणाऱ्या कसोट्या 'मानापमाना'ला लागू शकणार नाहीत. 'मानापमान' 'मेलोड्रामा' म्हणूनच पाहायला पाहिजे. शक्यता व संभवनीयता, अपरिहार्यता व आवश्यकता यांची बंधने बाजूला सारूनच हे हलकेफुलके नाटक पाहिले पाहिजे, ही गोष्ट वा.लं.नीच प्रथम ओळखली. 'मानापमाना'च्या वाङ्मयीन प्रकृतीला साजेसे माझ्या पाहण्यातले पहिले मार्मिक परीक्षण पुन्हा हेच आहे.

 हा मार्मिकपणा (व ही रसिकता) पुष्कळदा पुनर्मूल्यमापन अपरिहार्य करून टाकतो. हेही काम वा.लं.नी बरेच यशस्वी केले आहे. वामन मल्हार जोश्यांचे मराठी वाङ्मयात स्थान, हरिभाऊंच्यापर्यंत आलेल्या मराठी कादंबरीचा वामन मल्हारांत झालेला विकास, इत्यादी तपासताना असे पुनर्मूल्यमापन झालेच आहे. नेहमीची पद्धत म्हणजे वामन मल्हारांना वैचारिक कादंबरीकार, तत्त्वज्ञ कादंबरीकार म्हणण्याची. शेवटी लांबरुंद चर्चा म्हणजे वाङ्मयीन सोंदर्य नव्हे. कलावंत म्हणून मराठी कादंबरीत वामन मल्हारांचे स्थान काय याचे उत्तर देण्याचा प्रयत्न प्रथम वा.लं.नी केला. आता ते विवेचन जवळपास सर्वमान्य झाले आहे. हे विवेचन करताना 'रागिणी'चे मोटेपण वा.लं.ना नाकारावे लागले. 'सुशीलेचा देव' आणि विशेषतः 'इंदू काळे व सरला भोळे' या वामन मल्हारांच्या सर्वश्रेष्ठ कलाकृती आहेत, या नव्या निर्णयावर त्यांना यावे लागले. हे करताना वामन मल्हारांची सामर्थ व उणीवा ते सतत दाखवत गेले आहेत. चिंतनशील पात्रांचे स्वभावरेग्खन व थोर कलावंताच्या ठिकाणी असणारी निरूपणात्मक प्रतिभा यांचे स्वरूप ते स्पष्ट करीत गेले आहेत. वामन मल्हार हे कलावंत म्हणून हरिभाऊंच्यापेक्षा मोठे कलावंत आहेत हा निर्णय देणारे पहिले समीक्षक वा.ल. (वामन मल्हार कलावंत म्हणून फडक्यांच्यापेक्षा मोठे आहेत हे मत प्रथम व्यक्त करणारे मर्टेकर.) असेच पुनर्मूल्यमापन त्यांना लघुकथेबाबतही करावे लागले आहे. मराठी लघुकथेच्या विकासक्रमात एकीकडे क्रमाने 'मासिक मनोरंजन' व हरिभाऊंची 'स्फुट गोष्ट' यांच्यातून वा.ल. मराठी लघुकथेची पायाभरणी पाहतात. पण हे करताना दिवाकर कृष्णांचे स्थान निश्चित केल्याशिवाय ते पुढे जात नाहीत. कला म्हणून लघुकथेच्या विकासाला हातभार यानंतर कुणी लावला १ वा.लं.नी य. गो. जोशी, चोरघडे व कुसुमावती देशपांडे ही नावे घेतली आहेत. तंत्र म्हणून फडके व खांडेकर यांनी मराठी लघुकथेला नवा आकर्षकपणा दिला असेल, तिला लोकप्रियही केले असेल, पण कला म्हणून लघुकथेच्या विकासात या मंडळींचे स्थान काय ? इथून पुढे ते नवकथेपर्यंत येतात. लघुकथेचे वा.लं.नी केलेले हे मूल्यमापन गंगाधर गाडगीळांच्या विवेचनापेक्षा अधिक निकोप आहे हे तरी मान्य केले पाहिजे किंवा तंत्राचा विकास हाही कलेचा एक विकास आहे, हा तंत्रवाद स्वीकारून वा.लं.चे विवेचन सुधारले पाहिजे. व्यक्तिशः मी बव्हंशी वा.लं.च्या मूल्यमापनाशीच सहमत आहे.

वा. ल. कुलकर्णी : एक समीक्षक ६१