या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

पद्धतीने का होईना, पण फार उत्कट असते. अनेक सामाजिक गट प्रथमतःच, निदान तत्त्वतः तरी, मुक्त झालेले दिसतात. हनुमंताप्रमाणे प्रथमच त्यांना आपल्यातील सुप्त सामर्थ्याचे दर्शन घडत असते. घटनात्मकरीत्या व्यक्ती म्हणून आपल्या हक्कांना त्यांनी सामाजिक मान्यता मिळविलेली असते. त्यामुळे आकांक्षेची प्रचंड वाढ झालेली असते. पण व्यवहारतः ह्या सर्व धडपडीतून पदरात फारसे काहीच पडलेले नसते. दारिद्रय आणि गुलामगिरीच्या वेड्या प्रत्यक्षात अजून तशाच जीवनाला जखडून टाकीत अस्तित्वात राहिलेल्या दिसतात. जीवनात प्रचंड घालमेल चालू असते. अस्मितेच्या उदयाने जुने फोड ठसठसत असतात. नव्या पुटकुळ्यासुद्धा फार दुःखद वाटतात. या वातावरणात कटुता आणि विफलता, निराशा आणि चीड यांचा मोठ्या प्रमाणात उदय होतो. अशा या अवस्थेत असणाऱ्या सामाजिक स्तरांनी समाजाचा ऐंशी टक्के भाग व्यापलेला असतो. या समाजाचा जो प्रचंड आक्रोश चालू असतो, त्यातच नव्या व्यवस्थापनाच्या मांडणीचे सूत्र असते. या प्रक्षोभाचे स्वरूप सामाजिक असते. हा सामाजिक प्रक्षोभ वाङ्मयात अभिव्यक्त का होत नाही, हे दुःख ललित साहित्यात रूपान्तरित का होत नाही, हा खरा चर्चेचा प्रश्न आहे.

 या प्रश्नाची चर्चा करण्यापूर्वी एक गोष्ट स्पष्ट केली पाहिजे. ती ही की, हा प्रश्न वाङ्मयीन मूल्यमापनाचा किंवा सामाजिक उपयोगितेचा भाग म्हणून विचारात घेतलेला नाही. सामाजिक प्रक्षोभ वाङ्मयात व्यक्त झाला तर ती गोष्ट समाजक्रांतीला उपयोगी ठरेल, त्यामुळे क्रांती लवकर होईल, एरव्ही क्रांतीला उशीर होईल या चिंतेने या चर्चेत भाग घेणाऱ्यांचे मन त्रस्त झालेले नसावे. क्रांतीच्या जटिल प्रक्रियेत ललित वाङ्मयाचा भाग फार गौण व थोडा असणार. वैचारिक वाङ्मय, नेतृत्व, संघटना आणि संधी या घटकांचेच कोणत्याही क्रांतीत आद्य महत्त्व असते. गौण म्हणून का होईना, पण वाङ्मयाने समाज परिवर्तनाला उपकारक व्हावे, या सदिच्छेतूनही या प्रश्नाचा विचार करण्याची माझी इच्छा नाही. हा प्रश्न जसा सामाजिक उपयुक्ततेचा नव्हे, तसाच वाङ्मयीन मूल्यमापनाचाही नव्हे. जेथे मूल्यमापनाचा प्रश्न उपस्थित होईल, त्या ठिकाणी सामाजिक प्रक्षोभाचा आविष्कार होत नाही हे कारण दाखवून इंदिरा संत, मंगेश पाडगावकर किंवा पु. शि. रेगे यांची काव्ये कलादृष्ट्या कमी दर्जाची आहेत, असेही कुणी वाङ्मयाचा जाणता म्हणणार नाही. त्याचप्रमाणे सामाजिक प्रक्षोभ आहे म्हणून अमुक वाङ्मय कलादृष्ट्या श्रेष्ठ आहे, असेही कुणी म्हणणार नाही. ज्या ललित साहित्यात सामाजिक प्रक्षोभाची अभिव्यक्ती आहे, ते साहित्य सफल असू शकेल तसे विफलही असू शकेल. सामाजिक प्रक्षोभाचा आढळ त्या वाङ्मयाच्या गुणवत्तेत भर घालू शकणार नाही. थोर ध्येयवादाचा प्रचारकी आक्रस्ताळेपणा आजच्या वाङ्मयात दिसावा असाही आग्रह नाही. हा प्रश्न वाङ्मयीन आकलनाचा आहे. कादंबरी, नाटक, कथा ही ललित साहित्याची अशी क्षेत्रे आहेत, की तेथे वास्तव जीवनाच्या प्रत्ययाचा व आकलनाचा आधार असल्याशिवाय कलावंताची केवळ संवेदनक्षमता कलाकृतीच्या अंगी पुरेसा जिवंतपणा आणू शकत नाही. काव्याचाही

आजचे मराठी साहित्य सामाजिकदृष्ट्या पुरेसे प्रक्षोभक आहे काय ? ८९