पान:पाश्र्चात्य पुरुषश्रेष्ठ.pdf/१०२

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे




 मार्टिन् लूथर

सवी सन १४८३ सालच्या नवंबर महिन्याच्या ११व्या तारखेस सॅक्सनी परगण्यांतील एसल्-बन येथे या विख्यात पुरुषाचा जन्म झाला. अमुक एक मूल पुढें दिग्विजयी होणार आहे असें आगाऊच कळत नसल्यामुळे त्याच्या लहानपणच्या आठवणी लोकांना फार थोड्या राहातात. पुढे मोठेपण प्राप्त झालें म्हणजे त्या मोठेपणाचा लोट मागे पसरत जातो व त्याच्या लहानपणाविषयीं कांहीं कळावेंसें वाटते; पण मुलाचे पाय पाळण्यांत दिसतात ही म्हण खरी असूनसुद्धां सामान्यपणें असें दिसून येईल कीं, पुढें दिगंत कीर्ति केलेल्या माणसाविषयीं त्याच्या लहानपणीं कांहीं विशेष कुतूहल उत्पन्न झालें होतें असें नाहीं. लूथरचें असेंच होतें. त्याच्या लहानपणची हकीगत माहीत आहे ती केवळ बेताबाताचीच. पहिल्या पहिल्यानें बापाच्या घरची गरीबीच होती. पण पुढे हळुहळू त्याचा जम बरा बसत चालला आणि त्यानें घरदारही केलें. हा गृहस्थ स्वभावानें थोडा तापटच असावा; कारण पोरांबाळांवर त्याची कदर मोठी असे. कोणाची कांहीं चूक झाली तर गय करणें त्यास माहीत नसे. चूक करणारास सडकून चोप बसत असे. बापाच्या या वचकामुळे 'आपले कुठें कांहीं चुकत आहे कीं काय?' असे लहानग्या लूथरास सदैव वाटावे. आपल्या हातून चुका होतात व म्हणूनच बाप शिक्षा करतो, ही गोष्ट त्याच्या मनांत कायमची बाणून गेली होती. आपण चुकीस पात्र आहों हा संसारांतील साधा नियम, म्हणजे घरीदारी आपल्या रोजच्या व्यवहारांत आपल्या हातून प्रमाद होतात ही साधी जाणीव, त्याच्या मनांत पसरत जाऊन तिचें पुढे असें रूप झालें कीं, मनुष्य जात्या प्रमादशील आहे म्हणजे पातकी आहे आणि घरांतील चुकांबद्दल जसा बाप, तसा इहलोकच्या प्रमादांबद्दल परमेश्वर मनुष्यप्राण्याला शासन करतो. 'मी पातकी, मी पातकी' ही जाणीव