कसें येईल? कोलंबसास यावर कांहीं तोड सुचेना. पण दैवयोगानें पश्चिमेकडून वारा वाहूं लागला! व खलाशांचा जीव भांड्यांत पडला. कारण कीं, इतक्या दूरच्या समुद्रावरही वाऱ्यास पश्चिमेकडून वहात येण्याची संवय आहे हें त्यांस दिसलें! पुढें तीन चार दिवसांनी वारा अगदींच पडला. समुद्र हलेना कीं डोलेना. खलाशांस वाटलें आतां तर बोटी जागच्या हलावयाच्यासुद्धां नाहींत! समुद्रांत मध्येच असलेल्या एखाद्या उथळ जागीं आपण आलों असून रेताडांत वगैरे नावा अडकणार ही भीति त्यांस वाटू लागली. कोलंबसाने लागलीच नांगर टाकून किती खोल पाणी तेथें आहे हें त्यांस पटवून दिलें. तरी त्यांस दम निघेना. ते म्हणत, 'असें जर आहे तर नावा सरकत कां नाहींत?' पण दैवयोगानें दुसरे दिवशीं समुद्रास गरगरून भरतें आलें व नावा भराभर चालूं लागल्या. तरी पण जमीन कोठेंच नाहीं! मागली फार मागें राहिली; पुढें असेलच अशी खात्री नाहीं. नावाड्यांत फार चुळबूळ सुरू झाली. "राजानें हा कोठला भुरटा परदेशी जवळ केला आणि स्वदेशच्या माणसांच्या गळ्याला दावें लावून तें त्याच्या हातीं दिलें." अशी जो तो तक्रार करूं लागला. "लोक चांगलें सांगत होते कीं, हा उगाच एक उडाणटप्पू भटक्या आहे. पण तें राजानें ऐकलें नाहीं आणि आतां आमच्या जिवाला तांत लागली आहे, आम्हीं याचें आतां कां ऐकावें?" दुसरा म्हणे, "खरेंच आहे. परत फीर म्हटलें तर हा ऐकत नाहीं." तिसरा म्हणाला, "हा बऱ्या बोलानें ऐकेलसें दिसत नाहीं. त्याला जरा चुणूकच दाखविली पाहिजे." शेवटीं कांहीं लोक बेफाम होऊन त्याला म्हणाले, "आतां जर तूं परत फिरला नाहीं तर तुझे हातपाय बांधून तुला समुद्रांत फेंकून देऊ. नाहीं तर परत फीर." कोलंबसही भला हिकमती व धीट होता. केव्हां शिवी हसडून, केव्हां दादा-बाबा करून, केव्हां भेद पाडून तो त्यांस वळवीत असे. एकदां असें झालें कीं, पिंझो आपल्या जहाजावरून 'जमीन जमीन'
पान:पाश्र्चात्य पुरुषश्रेष्ठ.pdf/१४०
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
पुरुषश्रेष्ठ
१३६