पान:पाश्र्चात्य पुरुषश्रेष्ठ.pdf/१४८

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे




 ऑलिव्हर क्रॉम्वेल

लिव्हर क्रॉम्वेल याचा जन्म इ० स० ११९९ साली झाला. चुलत्याचेंच नांव याला मिळालें. चुलता थोडा प्रसिद्ध माणूस होता व नामकरणविधीच्या वेळेस ख्रिस्ती लोकांत जो एक गॉडफादर म्हणून करावा लागतो तोही त्याचा चुलताच झाला असल्यामुळें त्याचेच नांव त्याला दिलें गेलें. क्रॉम्वेलचा बाप मात्र आपली शेतीभाती संभाळून असे. पदरीं चार पोरेंबाळे असल्यामुळे तेवढ्या शेतीवर चालेना म्हणून तो दारू गाळण्याचाही धंदा करी. आपला धंदा बरा कीं आपण बरे अशी त्याची प्रवृत्ति असल्यामुळे तो शहराकडे वगैरे फारसा फिरकत नसे. मुलें पुढें मोठीं निवटलीं म्हणजे त्यांच्या त्या भावी मोठेपणाच्या खुणा लहानपणच्या वयांत कांहीं सांपडतात काय याची चौकशी माणसें करतात; व चौकशीसच निघाल्यानंतर त्यांच्या हातीं कांहींना कांहीं तरी लागतेच. असें सांगतात कीं, ऑलिव्हर हा अगदीं लहान असतांना एके दिवशीं एका वानरीनें, त्याच्या आईचा डोळा चुकवून, घरांत पाळण्यापर्यंत शिरकाव केला व बाळंत्यांत निजलेल्या या मुलास पोटाशी घेऊन तिनें दूर उड्डाण केलें. कोठें कौलाघरावर बसून त्या भांबावलेल्या माणसांना खिजविण्याचे काम या वानरीनें चालू केलें. सगळ्या आळींतील माणसें गाद्या, ब्लॅकेटें, पासोड्या घेऊन तेथें धावली; अशासाठीं कीं, वानरीनें जर कदाचित् बाळ खालीं टाकून दिलें तर तें अल्लाद झेलतां यावें. वानरीने मुलाच्या आईचें दुःख पाहून आणि आळीकरांचा कल्लोळ पाहून मूल हलकेच खालीं आणिलें व यत्किंचितही न दुखवितां रस्त्यावर ठेवून दिलें.