पान:पाश्र्चात्य पुरुषश्रेष्ठ.pdf/२४

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१९
शिकंदर
 

गेलो असतां आपणांस भेटतील असें वाटून त्यानें सिंधुनदीच्या रोखाने निघावयाचे ठरविलें. त्यानें आजूबाजूच्या शूर लोकांतून शिपायांची नवी भरती केली; व जवळ जवळ एक लाख फौजेसह तो हिंदुकुश पर्वताच्या बारींतून इकडे येण्यास निघाला. बरोबर लुटीचें सामानसुमान इतकें जमा झालें होतें कीं, दिवसाच्या कांठीं मजल फार थोडी होऊं लागली. हे त्याला आवडेना, म्हणून सर्व फौजेंत त्यानें हुकूम सोडले कीं, अगदी जरूर तेवढेंच सामान प्रत्येकाने जवळ ठेवावें व बाकीचें जाळून टाकावें. कदाचित् शिपाई लोक कांकूं करतील हे ध्यानांत घेऊन त्यांना उदाहरण घालन देण्याच्या हेतूनें त्यानें आपल्या विलासाच्या व सुखोपभोगाच्या सर्व वस्तूंची शिपायांच्या समोर होळी केली. अर्थात् शिपायांनाही तसें करणें प्राप्तच झालें. मजल दरमजल करीत शिकंदर खैबर घाटांतून प्रत्यक्ष हिंदुस्थानांत उतरला.
 तक्षशिलेस एक लहानसें राज्य होतें. तेथील राजानें गोडीगुलाबीनें वागून हे अरिष्ट पुढे लावून दिले; पण झेलम नदीच्या अलीकडे मात्र त्याची प्रगति इतकी सहजासहजी होण्यासारखी नव्हती. तेथून खालीं पोरसचें बलाढ्य राज्य पसरलें होतें. खुद्द पोरस एकाद्या राक्षसासारखा महाधिप्पाड माणूस होता. ह्या अरिष्टाची वर्दी लागतांच शत्रूला अडविण्यासाठीं नदी धरून तो बसला. नदीलाही पूर येऊन पाणी आसमंतात् पसरलें होतें. दोन्ही दळें नदीच्या दोन तीरांवर ठाण मांडून राहिली. पण पोरसला हुलकावण्या देण्याचें काम शिकंदरनें लवकरच चालू केलें. त्याच्या तोंडावर बरीच फौज ठेवून नदी उतरण्याचा डौल त्याने अनेक ठिकाणीं घातला. हें त्यानें इतक्या वेळां केलें कीं, याच्याने नदी उतरवत नाहीं अशी पोरसच्या लोकांची खात्री झाली. शेवटी एके दिवशीं रात्री नदीकांठानें बरेंच वर सरकून त्यानें एक उतार शोधून काढला; व तेथून सुमारें बारा हजार लोक झेलमच्या अलीकडे आणले. यांनी सकाळ होतांच पोरसच्या बगलेवर मारा करण्यास सुरुवात केली.