पान:पाश्र्चात्य पुरुषश्रेष्ठ.pdf/२९

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे




 हॅनिबल

प्रसिद्ध कार्थेजवाला सेनापति हॅनिबल हा इसवी सनापूर्वी २४७ व्या वर्षी जन्मला. युद्धाचे नियम जाणणारे इतिहासकार हॅनिबल याची गणना सगळ्या जगांत जे मोठमोठाले सेनापति होऊन गेले त्यांत करतात. पण हा जर केवळ सेनापति म्हणूनच मोठा होऊन गेला असता तर त्याचें महत्त्व इतिहासांत इतकेंसें शिल्लक राहिलें नसतें. त्याच्या नांवाशीं एका मोठ्या राष्ट्राचा व संस्कृतीचा इतिहास संलग्न झालेला आहे. त्याच्या अपयशाबरोबर तें राष्ट्र व ती संस्कृति हीं झपाट्यानें लयास गेलीं; व नामशेष शब्दाच्या खऱ्या अर्थानेच इतिहासाला त्यांची सध्यां ओळख आहे. हें राष्ट्र म्हणजे कार्थेजेनिअन लोकांचें होय, व ही संस्कृति म्हणजे फिनिशिअन लोकांची होय. हॅनिबलने यांच्या उत्कर्षासाठीं जें अचाट कृत्य केलें त्यांत जर त्याला यश मिळालें असतें तर तेथून पुढील इतिहासाची घडण खास निराळी झाली असती. हें कार्थेजेनिअन राष्ट्र व ही फिनिशिअन संस्कृति यांसंबंधानें थोडीशी ओळख प्रथम व्हावयास हवी.
 भूमध्यसमुद्राच्या पूर्वकिनाऱ्यावर जो एक सिरिआ नांवाचा देश आहे, त्याच्या पश्चिमेस असलेल्या उंच पर्वताच्या व समुद्राच्या मध्ये एक कोकणपट्टी आहे. ही सरासरी दीडशे मैल लांब व दहा पंधरा मैल रुंद अशी आहे. पाठीमागें डोंगरांच्या रांगांवर रांगा पसरलेल्या असल्यामुळे पूर्वेकडून या सखल प्रदेशांत फारसें कोणी उतरत नसे; आणि समोर अफाट समुद्र पसरला असल्यामुळे तिकडूनही येथें कोणी येत नसे. अशा या निवान्त प्रदेशांत जे लोक रहात त्यांस फिनिशिअन असें म्हणत. हे तरी तेथें कोठून आले याची वार्ता इतिहासाला नाहीं. कारण त्यांनी स्वतः एक स्वतंत्र लिपी उत्पन्न करून जरी ती जगांतील