इटली, स्पेन, फ्रान्स, इंग्लंड किंबहुना आफ्रिकेचें खालचें टोंक व हिंदुस्थान येथपर्यंतसुद्धां नेऊन पोहोंचवावे हा त्यांचा क्रम असे. ही दर्यावरची मुशाफरी त्यांनी कित्येक शतके चालविलेली होती. त्यामुळे पृथ्वीचा नकाशा त्यांना प्रत्यक्षच फार बारकाईनें माहीत झाला होता. समुद्रकाठीं सांपडणारे कांहीं विशेष प्रकारचे मासे शिजवून त्यांच्या चरबीचा एक जांभळा रंग ते तयार करीत. तो लोकरीवर इतका सुंदर वठे कीं, त्याचीं उत्तम दोन पुटें दिलेली अच्छेर लोकर जवळपास पांचशे रुपयांला लोक आनंदाने विकत घेत. या लोकरीचे केलेले लहंगे असे तकतकीत दिसत कीं, अगदीं साधें सणंगसुद्धां हजार रुपयांपर्यंत जाई. युरोपांतील मोठमोठ्या राजेरजवाड्यांच्या व सरदारजहागिरदारांच्या झनान्यांत या रंगीत लोकरीला फार मोठी गि-हाइकी असे.
प्रथम याच लोकांनी कांच तयार केली. पण नुसती कांच बनविण्यावरच ते खूष राहिले नाहीत. तर तिचे पुष्कळ प्रकारही ते बनवीत. एक कांच शुद्ध पारदर्शक, दुसरी रंगीत पट्ट्यापट्यांची व तिसरी हिरेमाणकांच्या जातीची. जर या तिसऱ्या कांचेचीं माणकें इत्यादि बनविलीं, तर खरें माणिक कोणचें आणि बनावट कोणचें याचा दर्दी जवाहिऱ्यालासुद्धां भ्रम पडे. रंगीत कांचेचीं ते हरतऱ्हेची भांडीही करीत. ह्या कांचेच्या सामानावर व रंगीत लोकरीवर जसे ते गबर झाले, तसेच शेजारी असलेल्या सायप्रस बेटांतील इमारतीच्या लांकडांवरही त्यांनीं अगणित पैका मिळविला. सध्या सायप्रस नांवानें माहीत असलेलें जें इमारतीचें लांकूड आहे त्याच्या नांवाचा आरंभ या फिनिशिअन लोकांच्या व्यापारांत सांपडेल. याच सायप्रस म्हणजे कायप्रस बेटांत त्यांनीं कॉपर (तांबें) धातूचा शोध लाविला व या वस्तु इतर देशांत नेऊन त्यांनी मानवी संस्कृति निःसंशय अधिक रम्य तऱ्हेची केली.
पान:पाश्र्चात्य पुरुषश्रेष्ठ.pdf/३१
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
पुरुषश्रेष्ठ
२६