दिवसांनी हॅज्ड्रुबलचा खून झाला आणि आतां वयांत आलेला हॅनिबल सर्व कार्थेजेनिअन फौजांचा सेनापति व त्या राष्ट्राचा पुढारी बनला. दरम्यान कार्थेजमध्यें या उलाढाली चालू असतां तिकडे रोमन लोकांनीं चांगलें आरमार तयार केलें आणि आसपासच्या समुद्रांत आपलें वर्चस्व प्रस्थापित केलें. हॅज्ड्रुबल आणि हॅनिबल यांनी चालविलेलें स्पेन देशाचें आक्रमण रोमन लोकांस खपेना. म्हणून त्यांनी हॅनिबल यांस ताकीद दिली कीं, एब्रो नदीपर्यंतच तुम्हाला उत्तरेकडे पाय पसरावयास आम्ही परवानगी देऊ. तुम्ही पुढे सरकल्यास कामास पडणार नाहीं. हॅनिबलला त्यांचें मन पहावयाचें होतें. म्हणून त्यानें एब्रो नदीच्या दक्षिणेसच असलेल्या, पण रोमन लोकांना हवें असलेल्या सागंटम शहरावर हल्ला केला व तें शहर त्यानें काबीज केलें. रोमचें सरकार संतापून गेलें व त्यांनीं कार्थेजला वकील धाडून तेथील सरकारास चमकाविलें कीं, 'तुमच्या सेनापतीनें आमचा अपमान केला; याची भरपाई म्हणून त्यास तुम्हीं आमच्या हवालीं करावें'. कार्थेजेनिअन सेनेटपुढे हा फार मोठाच प्रश्न येऊन पडला. फेबिअस नांवाचा जो रोमन वकील आला होता त्यानें विचारिलें कीं, 'तुम्ही ही अट पत्करतां कीं युद्धास उभे राहतां? एक काय तें बोला'. त्यावर सेनेटनें उत्तर केलें 'तुम्हांस काय हवें तें तुम्हीच सांगा'. त्यावर फेबिअसनें आविर्भावानें दर्शविलें कीं, आपणास युद्धच हवें. रोमन लोकांचें युद्धाचे आव्हान वायां गेलें नाहीं. सर्व सभासद गर्जून ओरडले, 'बेहेत्तर! तुम्हांस युद्ध हवें तर आम्हीही युद्धच करतों'. याप्रमाणें युद्धाचें शिंग फुंकलें गेलें हें दुसरें प्यूनिक युद्ध होय. हॅनिबल यानें मोठी मसलत रचण्याचें ठरविलें. ज्यांना ज्यांना रोमन राष्ट्रानें दुखविलें होतें त्या त्या सर्व लोकांना एकत्र करून त्याने मोठी फौज उभारली. रोमचें राष्ट्र गारद करून टाकण्याचा बेत त्याने ठरविला. कोणास फारशी वार्ता लागू
पान:पाश्र्चात्य पुरुषश्रेष्ठ.pdf/३५
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
पुरुषश्रेष्ठ
३०