पान:पाश्र्चात्य पुरुषश्रेष्ठ.pdf/९८

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
पुरुषश्रेष्ठ
९४
 

आहे. पण तुम्हीं त्यास उचल्यांचा खुंट बनविलें आहे'. मग कित्येक आंधळे, पांगळे त्याजकडे आले त्यांस त्यानें बरें केलें. त्यानें केलेले चमत्कार पाहून मुलेंसुद्धां जोरजोरानें 'दाउदाच्या पुत्राचा जयजयकार असो!' असें ओरडूं लागलीं. येशू देवळांतून बाहेर गेला व आपल्या शिष्यांजवळ अशी भविष्यवाणी बोलला कीं, 'या देवळाचा सत्यानाश होणार आहे. माझ्यामुळे तुमच्यावर संकटें येतील, खोटे भविष्यवादी उपस्थित होतील, तुमच्यावर आमची श्रद्धा आहे असें जे कोणी आतां म्हणत आहेत ते सर्व थंडावतील व जो शेवटपर्यंत टिकेल तोच तरेल'. त्याला सांगावयाची होती ती गोष्ट आतां संपत आली. आपला जीवितहेतु संपला याची जाणीव त्याला आली.
 वार्षिक यात्रेसाठी पुन्हा यरुशलेमला जावयाचें त्यानें ठरविलें. काय असेल तें असो त्याला वाटू लागलें कीं, दोन दिवसांच्या आंत आपणांस मृत्यु येणार. मग आपल्या शिष्यांच्या मेळांत बसून एकदां जेवावें असें त्याने ठरविलें. नम्रता म्हणजे काय हें शिष्यांस दाखवावें म्हणून त्यानें आपल्या शिष्यांचे पाय धुतले व म्हणाला, 'मी तुमचा गुरु व स्वामी असतांना मी तुमचे पाय धुतले तर तुम्हींही एकमेकांचे पाय धुतले पाहिजेत. उदाहरणासाठींच हें मीं केलें'. हे शब्द तो उच्चारीत आहे तोंच त्याला खिन्नता आली व तो म्हणाला, 'तुम्हांस खात्रीनें सांगतों, तुमच्यापैकींच एकजण मला शत्रूच्या हवाली करील'. तेव्हां सगळे शिष्य एकमेकांकडे संशयानें पाहूं लागले. येशू म्हणाला, 'मी तुकडा बुचकळून ज्याच्या हातीं देईन तोच माझा घात करील'. त्यानें तुकडा बुचकळला व सायमनचा मुलगा यहूदा इस्कारयोत याच्या हातीं दिला. शेवटचें सांगणें म्हणून येशूने त्यांना सांगितलें, कीं, 'माझें जसें तुमच्यावर प्रेम आहे तसें तुम्ही एकमेकांवर प्रेम करा. तसें तुम्हीं केलें म्हणजेच तुम्ही माझे शिष्य आहां असें ठरेल. मुलांनो, मी आतां जातो. तुमचा माझा सहवास फार थोडा उरला