या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

विश्वस्त आहेत आणि ती विश्वस्त मिळकत व्यक्तिगत (खाजगी) ठरली आहे. त्या अर्थाने ते सर्वाधिकारी वा स्वामी आहेत हे खरे. श्रीगणपती संस्थानच्या देखरेखीसाठी त्यांना वार्षिक वीस हजार रुपये तनखाहि मिळतो असे कळते. ही सर्व देखरेख ते बव्हंशी मुंबईहून वा मॉरिशसन करतात हेहि तितकेच खरे आहे. असे असतां विश्वस्त पत्राच्या मूळ उद्देशावर बोळा फिरवून सिनेमा थिएटर बांधण्याची विपरीत बुध्दि त्यांना कां सुचावी हे एक अनाकलनीय कोडेच आहे. या संदर्भात त्यांनी राजमाता श्रीमंत सौ. पद्मिनीराजे पटवर्धन यांचे मार्गदर्शन घेतले असते तर आमची अशी निश्चिती आहे की त्यांनी असा सल्ला दिलाच नसता. यावर सांगली नगर वाचनालयाने बाहेरील जागेत दुकाने बांधली म्हणून ज्यांनी नापसंती व्यक्त करुन वाचनालयाचा मीनाबाजार करु नका असे परखड उद्गार काढले होते त्या, श्रीकेंगणेश्वरी चौकात सिनेमाथिएटरचा मायाबाजार मांडा असा सल्ला कधीच देणार नाहीत. परंतु आजकाल विसंगत गोष्टीचे पेवच फुटले आहे. तेव्हा नगर वाचनालयाचा मीना बाजार, नाट्यमंदिराचा कॅबरे नृत्य बाजार, केंगणेश्वरी मंदिराचे केंगणेश्वरी सिनेमागृह असे रुपांतर व्हावयास कांहीच वेळ लागणार नाही. तरीपण गणपति संस्थानचे जे एकमेव विश्वस्त आहेत, त्यांना तरी निदान आपण काय करतो याची जाणीव असावयास हवी.

 आपल्या पुढच्या पिढीतील वारस, उत्पन्नाचे अभावी उपाशी राहू नयेत म्हणून दूरदृष्टीच्या संस्थानाधिपतीनीं श्रीगणपती पंचायतन कायदा संमत करुन घेऊन हे स्वतंत्र संस्थान केले. भारतीय घटनेने आतां संस्थानिक व त्यांचे तनखे नष्ट झाले आहेत. या काळाला कलाटणी देणाऱ्या घटनेची बाधा या गणपती संस्थानला न होवो म्हणजे झाले ! पण विश्वस्तानी अट्टाहासाने श्री केंगणेश्वरी चौकांत थिएटर बांधणेचे ठरविलेच तर खवळलेले गणपतीभक्त या गोष्टीला प्रखर विरोध केल्यावाचून रहाणार नाहींत. पिढ्यानपिढ्या ज्या देवस्थानशी पूज्यभाव, श्रध्दा आणि निष्ठा निगडीत झाल्या आहेत व त्यामुळे जो भाविक अधिकार असंख्य स्त्रीपुरुष नागरिकांना प्राप्त झाला आहे तो डागळण्याचा वा छिनावून घेण्याचा समय आला असतांना ते स्वस्थ बसणे कदापीही शक्य नाही. आजच्या गणराज्यांत लोकेच्छा बलियसि असते. मी मी म्हणणाऱ्यांनासुध्दा लोकमताला शरण जावे लागते. यापासून संबंधित विश्वस्तांना कांही बोध घेता आला तर तो त्यांनी घ्यावा असे आम्हांस स्पष्टपणे सुचवावयाचे आहे.

(४६)