पान:पुराणनिरीक्षण-पूर्वार्ध.pdf/१२४

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रकरण दुसरें. १०९ असले तरी मूळच्या भविष्यपुराणांतील अनेक कथा अजून विद्यमान आहेत, असें कळेल. तिसऱ्या भविष्यपुराणांत सातव्या अध्यायांत आगम, तंत्र, यामल, डामर यांचा उल्लेख असल्यामुळे तें त्या त्या ग्रंथांच्या काळानंतर बनलेलें असले पाहिजे. व & मत्स्यपुराणाच्या मतें व नारदाच्या मतें भविष्यपुराणांत अनेक भावी कथा आहेत. पहिल्या दुसऱ्या भविष्यपुराणांत याची थोडी थोडी प्रचीति मिळते. सांवानें सूर्यमूर्तीची प्रतिष्ठा शाकद्वीपांतील ' मग 'नांवाच्या ब्राह्मणांकडून करविली; तसेंच या ब्राह्मणांचे विवाह मग यादवकन्यांशीं होऊन त्यांपासूनच 'भोजकां'ची उत्पत्ति झाली ही कथा भविष्यांत आढळते. येथपर्यंत दिलेली माहिती पं. ज्वालाप्रसादांच्या माहितीप्रमाणे आहे. आतां मी स्वतः मिळविलेल्या माहितीवरून या पुराणाविषयीं अधिक लिहितों. मीं जी प्रत पाहिली आहे ती वेंकटेशप्रेसनें व त्यावरून वांईच्या पुराणप्रकाशक मंडळींनीं छापलेली पाहिली आहे. त्या प्रतीवरून खालील निरीक्षण आहे असे समजावें. या पुराणांत प्रारंभापासून सूर्याचें महत्त्व फार आहे. त्यालाच ब्रह्मही म्हटले आहे. भास्कररूपी परब्रह्मापासूनच ब्रह्मा ऊर्फ नारायण झाला असे यांत वर्णन आहे; म्हणजे पर्यायाने सर्व कांहीं सूर्यापासूनच उत्पन्न झालें असे म्हटले आहे. ब्राह्मपर्वाच्या चौथ्या अध्यायांत उपनयनादि संस्कारवर्णनास सुरवात असून अ० १६ अखेरपर्यंत गृहस्थधर्म, स्त्रीधर्म-स्त्रियांची कर्तव्यें वगैरे सांगितली आहेत. हा भाग वात्स्यायनाच्या कामसूत्रांशीं ताडून पाहण्यासारखा आहे. कदाचित् त्यावरूनही तो येथें घेतला असण्याचा संभव आहे; कदाचित् बाभ्रव्य-पांचालाच्या जुन्या कामतंत्रावरूनही घेतला असेल.