पान:पुरातत्त्वभूषण कै इतिहासाचार्य राजवाडे यांचे चरित्र.pdf/१७

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे


कै. इतिहासाचार्य राजवाडे.
विषय प्रवेश.

कै. विश्वनाथ काशिनाथ राजवाडे यांचें नांव सुशिक्षित महाराष्ट्रीयाच्या निकट परिचयाचें आहे. राजवाड्यांसारख्या गाढ्या पंडित प्रवराचें चरित्र मी लिहावयास घेणें म्हणजे टिटवीनें सागराचें गांभीर्य जाणूं पाहण्याप्रमाणे आहे. मी अप्रबुद्ध आहे; स्वतंत्र प्रज्ञेचा अल्पांशही मजमध्ये नाहीं; ज्या अनेक शास्त्रांत या विराट पुरुषाची विशालबुद्धी स्वैर संचारती झाली, त्या शास्त्रांचीं मला नांवें सुद्धां ऐकूनच माहीत. माझी ही यथार्थ स्थिति आहे; यांत फाजील विनय वगैरे कांहीं नाहीं. माझें मन मला पुन्हा पुन्हा सांगे की, राजवाड्यांसंबंधीं तूं काय लिहिणार? प्रश्न खरा; परंतु भक्तीला स्वस्थ बसवेना. राजवाड्यांच्याबद्दल माझ्या हृदयांत जी असीम भक्ति वसत आहे, तिला हें वरील तर्कट समजेना, राजवाडे यांच्यासंबंधीं जे जे उद्गार प्रत्यक्ष अप्रत्यक्ष वाचले वा ऐकले, त्या सर्वांचा उपयोग करून तूं लहानसे चरित्र त्यांच्या पुण्यतिथीच्या दिवशीं प्रसिद्ध कर, असें माझी भक्ति बोलूं लागली व म्हणून मी या कार्यास हात घातला. मला हें चरित्र त्या दिवशीं प्रसिद्ध करतां आलें नाहीं; परंतु आज तें लोकांसमोर येत आहे. 'स्तवार्थ तुझिया तुझ्यासम कवी कधी