पान:पुरातत्त्वभूषण कै इतिहासाचार्य राजवाडे यांचे चरित्र.pdf/२०

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
जन्म. बालपण व शिक्षण.

यामुळे आठवड्यांत फक्त दोन तीन दिवस घटका अर्धघटका अभ्यास करूनही पंतोजीची कृपा राजवाडे यांस संपादितां येई. ते म्हणतात "जर चांगला शिक्षक मला मिळता तर ३ वर्षांत मी बी. ए. इतकी तयारी केली असती" या गोष्टींत कोणास अतिशयोक्ति वाटेल, परंतु मला तसें कांहींएक वाटत नाहीं. मिलसारखे पंडित किती बालवयात लॅटीनग्रीक भाषांचे पंडित झाले, ज्ञानेश्वरांसारखे किती बालवयांत भाष्यकारांस मागोवा पुसणारे झाले, ईश्वरचंद्र विद्यासागरांसारखे विशालधी १५।१६ वर्षे वयाचे असतांना कसे सर्व-शास्त्रपारंगत झाले. हें पाहिलें म्हणजे राजवाडे यांच्या म्हणण्यांत मला अत्युक्तीचा अंश दिसत नाहींसा होतो.
 मराठी ४ थी इयत्ता शिकल्यावर राजवाडे पुण्यास आले व इंग्रजी शिकूं लागले. १८७६ मध्ये ते पुण्यास बाबा गोखले यांच्या इंग्रजी शाळेत दाखल झाले. या शाळेत ३।४ शें मुलें होती. शाळा सकाळी सहा वाजल्यापासून दुपारी १० वाजे पर्यंत असे. कारण शिक्षकांस दुपारी इतर व्यवसाय करण्यास मोकळीक असावी म्हणून ही योजना असे. शाळा अगदी गलिच्छ ठिकाणी असे. दमट व कोंडलेली अशी हवा असावयाची. मोकळी, खेळती हवा तेथें मिळावयाची नाहीं. पडक्या भिंती, गटारे, डांस यांमुळे प्रसन्नता मुळीं नसे; पायखानेही तेथें लागूनच; यामुळे दुर्गंधीचें माहेरघरच तेथें होतें. एकाच वर्गात अनेक मुले असत. त्या मुलांची तयारी सर्वांची सारखीच नसे. कोणी जास्त शिकलेला, कोणी कमी; कोणी हॉवर्डचे पाहेलें पुस्तक पढलेला. तर कोणी दुसरें वाचावयास शिकलेला. तरी सर्व एकाच वर्गांत. एकच मास्तर या निरनिराळ्या मुलांस नवीन धडे