पान:पुरातत्त्वभूषण कै इतिहासाचार्य राजवाडे यांचे चरित्र.pdf/८

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

यांचें सांगोपांग चरित्र हाती घेता येईल.
 रा. साने यांचा प्रयत्न त्या दृष्टीचा नाहीं. साधारण बहुश्रुत वाचकास राजवाडे यांच्या योग्यतेची ओळख व्हावी म्हणून हा प्रयत्न त्यांनीं केला आहे. अशी या सानेकृत चरित्रसिद्धीची मर्यादा आहे. हें लक्षांत ठेवूनच त्यांच्या ग्रंथाकडे पाहिलें पाहिजे.
 या ग्रंथावरून राजवाडे यांची कांहींशी ओळख जरी वाचकांस होईल तरी त्यांची खरी आणि पक्की ओळख त्यांच्या लेखांच्या व कार्याच्या परिशीलनानेंच होणार आहे. राजवाडे यांच्या मृयूनंतर त्यांच्याविषयीं ज्या आख्यायिका व आठवणी प्रसिद्ध झाल्या आहेत त्यांतही चुकीची माहिती व भ्रामक अनुमानें आलेली आहेत. उदाहरणार्थ राजवाडे यांच्या बंधूंकडून राजवाडे यांस चुलतीकडून आलेली किंवा अन्य मदत मिळत असे त्यामुळे त्यांनीं उपासतापास काढून मोठा स्त्रार्थत्याग केला व हाल काढले हा प्रवाद खोटा दिसतो असा एक निष्कर्ष राजवाडे यांस न पाहिलेल्या एका गृहस्थानें कोणाकडून आलेल्या ऐकीव माहितीच्या आधारें एका वर्तमानपत्रांत प्रसिद्ध केल्याचे मी वाचलें! चुलतीच्या मत्तेचा वांटा चुलती मेल्यावर राजवाडे यांचेकडे यावयाचा होता, व तो त्यांचे सुशील व प्रेमळ बंधु यांनी त्यांस मिळाला तसा त्यांचे इच्छेप्रमाणें पोंचता केला. परंतु ही मदत फार थोडे दिवसच मिळाली. राजवाडे यांनीं विशेष हाल काढले ते विठ्ठल छापखाना जळून भाषांतर मासिकाचें वाटोळे झाल्यावर आणि पहिला खंड प्रसिद्ध केल्यावरच सुमारें १२ वर्षे काढले. पुढे पुढे हे हाल बंद झाले नाहींत तरी कमी झाले. असो. त्यांच्या जीवनाविषयीं असें पुष्कळ लिहितां