पान:पोशिंद्याची लोकशाही (Poshindhyanchi Lokshahi).pdf/१००

हे पान प्रमाणित केलेले आहे.

बुडख्यापासून तोडलं, तर कुत्रं एकदाच ओरडेल, थोडा वेळ विव्हळेल आणि मग शांत होईल. त्याऐवजी रोज थोडं थोडं कापलं, तर कुत्रं रोज केकाटणार आणि एखाद्या दिवशी संधी साधून चावणार. नेहरूनीतीनं देशाचं वाटोळं झालं, हे सर्वमान्य झाल्यानंतर ती टाकून द्यायची म्हणजे कुत्र्याच्या शेपटाप्रमाणे एका झटक्यातच तोडायला हवी.
 देशामधील नेहरूव्यवस्था टाकून, खुली व्यवस्था आणून, देशाचं भलं व्हायला मनमोहन सिंगांमुळे सुरुवात झाली; जगाशी व्यापार करू, आयात करू, निर्यात करू, गुंतवणूक करू असं ठरवलं; पण त्यानंतर दोनतीन गोष्टी घडल्या; त्यामुळे त्यांचा संकल्प पुढे जाऊ शकला नाही. तुम्ही जगाशी व्यापार करायला तयार झालात, तरी जग काही तुमच्याशी व्यापार करायला धजत नाही.
 अयोध्येची मशीद पाडली आणि सगळ्या हिंदुस्थानात दंगे झाले. वाहतूक ठप्प झाली. सगळा व्यवहार बंद पडला. जळगावची केळी, नाशिकची द्राक्षे जागच्या जागी खलास झाली. जगभरचे लोक म्हणाले, 'यांना पोरांना खायला भाकरी देता येत नाही आणि तेराव्या शतकात तिथं मशीद होती का मंदिर, यावर भांडण करून हे सगळे व्यवहार ठप्प करतात. यांच्याशी व्यापार करू नये. उद्या हे कशावर भांडण काढतील कोण जाणे आणि आपलं कंत्राट पुरं करतील, की नाही याचीही शंका.
 त्यानंतर मुंबईत बाँबस्फोट झाले. त्या वेळी व्यापारी करार करायला आलेली शिष्टमंडळे करार न करता परत गेली. ज्यांना कायदा आणि सुव्यवस्था पाहता येत नाही, जिथं गुंडांचं अधिराज्य आहे त्यांच्याशी व्यापार करून धोका कोण पत्करणार?

 चारपाच महिन्यांपूर्वी हिंदुस्थानात प्लेग झाला. साऱ्या जगात प्लेग नावाची गोष्ट शिल्लक नाही. फक्त हिंदुस्थानातच सापडला. प्लेग कुठून आला? नेहरूंनी शहरं वाढवली, कारखाने वाढवले, शेती उजाड केली; मग आमची पोरं शहरात जगायला गेली, झोडपट्ट्यांमध्ये, गलीच्छ वस्त्यांमध्ये राहायला लागली. सगळीकडे गटारं तुंबलेली, चिखल साठलेला, उंदीरघुशींचा सुळसुळाट, प्लेग होईल नाही तर काय? प्लेग झाला तो नेहरूंच्या धोरणामुळे झाला. या प्लेगला नाव द्यायचं तर 'नेहरू प्लेग'च म्हणायला पाहिजे. या प्लेगने देशाची बदनामी किती झाली? आपली माणसं परदेशांत गेली तर त्यांच्यावर औषध मारल्याशिवाय त्यांना आत घेत नाहीत. इथून गेलेलं विमानसुद्धा परदेशात धुऊन घेतात. मग व्यापार कोण

पोशिंद्यांची लोकशाही / १०२