पान:पोशिंद्याची लोकशाही (Poshindhyanchi Lokshahi).pdf/१४५

हे पान प्रमाणित केलेले आहे.

या निवडणुकीच्या वातावरणामध्ये, मोठमोठी राष्ट्रभक्त म्हणणारी मंडळी देशभर वाटेल त्याच्याशी साटेलोटे करून, सत्ता हस्तगत करण्याच्या धावपळीत असताना महाराष्ट्राच्या या माधानसारख्या कोपऱ्यातील गावात तुम्ही दीडदोनशे माणसे तरी 'व्यक्तिस्वातंत्र्या'च्या या विचाराने भारावून जाता आणि शिबिर लांबले, तर जांभई देण्याऐवजी टाळ्या वाजवून आनंद व्यक्त करता. गेली वीस वर्षे तुम्ही मला 'आयुष्याचे सार्थक झाल्याचे' आनंदाचे क्षण अनेकदा दिले, आज असाच आणखी एक क्षण दिला, याबद्दल तुम्हाला धन्यवाद देतो.
 निवडणुकीचे निकाल उद्या काय लागतील, ते लागोत? आपण जिंकूच याची खातरी नाही. लोक म्हणतात आपण हरणार असलो, तरी तसे म्हणू नका, आम्ही जिंकणारच आहोत असे म्हणा!
 मी जिंकणार आहे; त्याबद्दल माझ्या मनात शंका नाही. आजची चकमक जिंकेन किंवा नाही याची मला खातरी नाही आणि त्याची मला पर्वाही नाही; पण मी युद्ध जिंकणार आहे याबद्दल माझ्या मनात तीळमात्रही शंका नाही. आज मोठे वाटणारे, आज सिंहासनावर बसणारे, आज हत्तीवर बसणारे उद्या पायउतार झाले, की त्याचे इतिहासात नावसुद्धा राहत नाही. औरंगजेबानंतर दिल्लीच्या तख्यावर किती शहाजादे बादशहा बनून बसले; ते बादशहा होते तेव्हा सगळे त्यांना वाकून वाकून मुजरे करीत असणार, दरबारातले कवी, शायर त्यांच्या पराक्रमाची स्तुतिस्तोत्रे गात असणार. आज इतिहासामध्ये त्या बादशहांपैकी एकाचेही नाव लक्षात येत नाही. म. जोतीबा फुले खांद्यावर घोंगडे टाकून कोणत्या गव्हार्नर जनरलच्या दरबारात गेले असे विचारले, तर त्याचे नाव कोणाला माहीत असत नाही; पण जोतीबांचे नाव मात्र सर्वतोमुखी आहे. इतिहासात कोण जिंकले ते पाहा. आज जी टिनपाट माणसे सत्तेच्या खुर्चीवर बसून, मोठी झालेली दिसतात, त्यांची नावे ज्या वेळी इतिहासाच्या पटलावरून पुसली गेलेली असतील, त्या दिवशी 'व्यक्तिस्वातंत्र्याच्या लढाई'करिता धडपडणारे लोक म्हणून तुमचे नाव त्या इतिहासात राहणार आहे.

(२१ फेब्रुवारी १९९८)

◆◆

पोशिंद्यांची लोकशाही / १४७