पान:पोशिंद्याची लोकशाही (Poshindhyanchi Lokshahi).pdf/१५८

हे पान प्रमाणित केलेले आहे.

सरदार वल्लभभाई पटेल हे जास्त व्यवहारी आणि मुत्सद्दी होते असं आपण गृहीत धरतो. ते म्हणाले, या व्यवस्थेनं सर्वांत मोठ्या अल्पसंख्याक गटाला प्रमाणाबाहेर प्रतिनिधित्व मिळेल, हे मला माहीत आहे; पण ती गोष्ट चांगली आहे, असं मला वाटतं; कारण त्यावेळी स्वातंत्र्यानंतरची एक विशेष परिस्थिती होती. देशाची फाळणी झालेली होती, सर्वत्र दंगे माजलेले होते, काश्मीरमध्ये युद्ध चालू होतं, फुटीर चळवळी उभ्या राहत होत्या वगैरे वगैरे. तेव्हा मजबूत आणि स्थिर केंद्र सरकार असलं, तरच स्वातंत्र्य वाचेल, नाहीतर ते पुन्हा जाईल, अशी भीती लोकांच्या मनात होती. ही भीती इतकी तीव्र होती, की घटना मंजूर करणाऱ्यांनी जाणीवपूर्वक निवडून येणारी लोकसभा ही खऱ्या अर्थानं लोकप्रतिनिधींची नसावी. अशी व्यवस्था केली आणि केवळ अशी व्यवस्था केल्यामुळं पन्नास वर्षांपैकी चाळीस वर्षांमध्ये तुम्हाला स्थिर सरकार मिळालं. आता तोही काळ संपला.
 आता जातींचे किंवा अशा तऱ्हेच्या गटांचं बंधन कमी झालेलं आहे. आता ज्या निवडणुका होतील, त्या साहजिकच विविध प्रकारचे हितसंबंध लोकसभेत आणतील. पूर्वी काही समाजघटकांना अस्मितेची जाणीव नव्हती. अमुक अमुक उमेदवाराला मतं द्या म्हटलं, की ते त्याला मतं द्यायचे. आता ते म्हणतात, 'नाही, आम्ही आमच्याच माणसांना मतं देणार.' काही जातींचा प्रश्न करणारे 'बसप'सारखे पक्ष आले. मंडल आयोगाच्या आधारानं वेगवेगळे पक्ष आले. त्यामुळे यापुढं संसदेत विविधता येणं अपरिहार्य आहे. आता संसद खऱ्या अर्थानं लोकप्रतिनिधित्व करू लागली आहे. एके काळी संसद फार चांगली होती, ती आता खराब होऊ लागली आहे आणि आम्ही आता स्थैर्य आणणार आहोत, ही कल्पना चुकीची आहे. वास्तविक पाहता इतके दिवस संसद खऱ्या अर्थानं देशाचं प्रतिनिधित्व करीत नव्हती, ती आता देशाचं दिवसेंदिवस अधिकाधिक प्रतिनिधित्व करायला लागली आहे आणि म्हणूनच आघाड्यांची सरकारं अपरिहार्य आहेत. स्थिरता ही कृत्रिमरीत्या आणलेली होती. त्यानं देशाचं भलं झालेलं नाही. आता लोकसभा खऱ्या अर्थानं प्रातिनिधिक होऊ लागलेली आहे. त्यामुळं यापुढं आघाड्यांच्या सरकारांचा काळ येणार आहे आणि त्यात वाईट काही नाही. जगातल्या अनेक देशांमध्ये कित्येक वर्षे नव्हे, कित्येक शतकं आघाड्यांची सरकारं चाललेली आहेत. जगातला सर्वांतश्रीमंत देश म्हणून ओळखल्या जाणाऱ्या स्वित्झर्लंडमध्ये गेली साडेतीनशे वर्षे आघाड्यांची सरकारं चालू आहेत. स्थिर सरकार असताना जर्मनीचं वाटोळं झालं. दुसऱ्या महायुद्धानंतर पश्चिम जर्मनीमध्ये

पोशिंद्यांची लोकशाही / १६०