पान:पोशिंद्याची लोकशाही (Poshindhyanchi Lokshahi).pdf/१६६

हे पान प्रमाणित केलेले आहे.

ते प्रतिष्ठितांच्या वस्तीत, डाऊनटाऊनमध्ये जाऊन राहतील अशी व्यवस्था केली. निग्रो मंडळी प्रतिष्ठेसाठी डाऊनटाऊनमध्ये सोडून सबर्बमध्ये जाऊन राहू लागली. आज अमेरिकेमध्ये असं चित्र आहे, की डाऊनटाऊन म्हणजे निग्रो वस्तीचा-बेकार वस्तीचा भाग आणि सगळी मोठी माणसे सबर्बमध्ये राहताहेत. याचा अर्थ असा, की अशा तऱ्हेनं कृत्रिमता तयार केली तर त्यातून खुर्चीचं महत्त्व कमी होत जातं, त्या जागेचं महत्त्व कमी होत जातं.
 ज्या दिवसांपासून सरकारी नोकऱ्यांचे महत्त्व कमी होण्यास सुरुवात झाली, सरकारचं महत्त्व कमी होण्यास सुरुवात झाली, तेव्हापासून सवर्णांनी तिथून बाहेर पडण्यास सुरुवात केली. आता मागासवर्गीय तिथे जाताहेत. आता खरी आर्थिक सत्ता जिथे तयार होते आहे, तिथं सवर्ण जाताहेत. आज परदेशामध्ये जाऊन राहिलेल्यांमध्ये सवर्णांची संख्या सर्वांत जास्त आहे. ते पुन्हा एकदा सत्ता चालवायला येणार आहेत. दिल्लीला मंत्रालयामध्ये राहून आपल्या हाती सत्ता येईल असं जर दलितांना, मागासवर्गीयांना वाटत असेल, तर तो त्यांचा भ्रम आहे. हीच गोष्ट महिला आणि शेतकऱ्यांनाही लागू आहे. आर्थिक प्रश्नाला हात न घालता, कुणाचीही परिस्थिती सुधारण्याचा प्रयत्न केला, तर सुधारणेचा फक्त भास तयार होतो. त्याचा फायदा एकाच वर्गाला मिळतो. काही वेळा तर ते विपर्यस्त होतं. एक इंदिरा गांधी पंतप्रधान झाल्या की नाही? हा युक्तिवाद काही स्त्रियांच्या दृष्टीनं मला योग्य वाटत नाही. हेच जर तुमचं उद्दिष्ट असेल, तर मला काही म्हणायचं नाही. काही बायका आमदार-खासदार झाल्यामुळे समस्त स्त्रीवर्गाचं भलं झालं, त्यांनी आपल्या मागं असलेल्या बायकांसाठी काही केलं, अशी जर काही संगती तुम्ही दाखवून दिली, तर ते मानणे शक्य आहे. वर गेलेले शेतकरी बाकीच्या शेतकऱ्यांना योग्य भाव मिळू नये म्हणून प्रयत्न करतात, नोकरीत गेलेले दलित खालच्या वर्गाला मदत करण्याऐवजी त्यांचे धंदे सुधारू नयेत म्हणून प्रयत्न करतात... अशा परिस्थितीत 'काही लोक तरी वर गेले की नाही?' हा युक्तिवाद मला योग्य वाटत नाही.
 काँग्रेसची स्थापना पहिल्यांदा कुणी केली? हिंदुस्थानातील शहरांमध्ये उद्योगधंदे करणाऱ्या एतद्देशीय लोकांनी पहिल्यांदा अशी मागणी केली, की आयसीएसमध्ये आमच्या जास्त लोकांची सोय असली पाहिजे, आयसीएसमधल्या अधिकाराच्या जागा हिंदुस्थानातल्या लोकांना मिळाल्या पाहिजेत. तुम्ही कार्यक्षम असला, तरी शेवटी तुम्हाला राज्य आमचं चालवायचंय आणि त्यासाठी तुम्ही आमच्या काही लोकांना घेतलं पाहिजे. या एतद्देशीय लोकांचा हेतू काही राज्य चांगलं

पोशिंद्यांची लोकशाही / १६८