पान:पोशिंद्याची लोकशाही (Poshindhyanchi Lokshahi).pdf/१९१

हे पान प्रमाणित केलेले आहे.

तयार झालेल्या काही कार्यकर्त्या महिलांना वेगवेगळ्या पक्षांनी ओढून घेतले. असेच पुरुष कार्यकर्त्यांच्या बाबतीतही घडले. पण, माझी खात्री आहे, की शेतकरी संघटनेच्या या विद्यापीठात तयार झालेली माणसे कोठेही जावोत - शिवसेनेत जावोत, भाजपात जावोत, मुस्लिम लीगमध्ये जावोत, का अन्य कोठेही जावोत - या 'मदरशा'ने त्यांना दिलेले जे एक चारित्र्य आहे, जी एक स्वच्छ विचार करण्याची पद्धती दिलेली आहे त्यांमध्ये ते कोठेही चुकणार नाहीत.
 हिंदू आणि मुसलमान समाजांमध्ये कडवेपणाचे शिक्के मारून, स्वार्थांध राजकारण्यांनी जी दुही खदखदत ठेवली आहे, ती दूर करून, त्यांच्यात सामंजस्य निर्माण करणे व त्यायोगे समाजाच्या आर्थिक विकासाच्या प्रक्रियेत त्यांना सहभागी करून घेणे, हे मोठे कठीण काम आहे. सगळ्या धर्मांच्या लोकांनी एकत्र चालावं, याकरिता दिल्लीच्या बादशहा अकबराने 'दीने इलाही' नावाचा वेगळा धर्म काढला. जोतीबा फुल्यांनीही अशाच हेतूने सत्यशोधक समाज तयार करण्याचा प्रयत्न केला. पण, दोन धर्मांच्या लोकांना एकत्र आणण्याकरिता तिसरा धर्म काढून फारसं काही हाती येत नाही असा अनुभव आहे. त्यामुळे, मी काही तिसऱ्या धर्माचा संस्थापक होऊ इच्छीत नाही, काम तेच आहे; पण माझा मार्ग थोडा वेगळा आहे.
 याच कामासाठी महात्मा गांधींनी फार मोठं कार्य केलं, त्यांनी आपलं रक्त सांडलं, त्यापायी. ज्या वेळी 'खिलाफत' टिकावी म्हणून कोणी मुसलमान नेतासुद्धा हिंदुस्थानात बोलायला तयार नव्हता, त्या वेळी एकटे महात्मा गांधी खिलाफत चळवळीच्या बाजूने उभे राहिले. मुस्लिम जगतात त्याबद्दल अजूनही कृतज्ञता बाळगली जाते. परवाच मी तुर्कस्थानात गेलो, तेव्हा तेथील लोकांनी म्हटले, की आमच्या खिलाफत चळवळीच्या वेळी जगामध्ये आमच्या बाजूने फक्त हिंदुस्थान आणि महात्मा गांधी उभे राहिले. सगळ्यांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या अशा या माणसाला त्याच्या आयुष्यात शेवटी काय पाहायला मिळाले? हिंदू आणि मुसलमानांनी एकमेकांचे कोथळे बाहेर काढले, एकमेकांचं रक्त सांडलं, एकमेकांची घरे पेटवून दिली, एकमेकांच्या स्त्रियांवर आणि मुलाबाळांवर अनन्वित अत्याचार केले... हे पाहण्याचे दुर्दैव त्यांच्या वाट्याला आले.
 धर्माधर्मांतील सामंजस्याचे हे काम असं महाभयंकर कठीण आहे; पण तितकंच ऐतिहासिक महत्त्वाचं आहे.

पोशिंद्यांची लोकशाही / १९३