पान:पोशिंद्याची लोकशाही (Poshindhyanchi Lokshahi).pdf/२०४

हे पान प्रमाणित केलेले आहे.

देशाला जी क्षमता लाभली आहे, त्याऐवजी पूर्वाश्रमीच्या सोव्हिएत रशियाप्रमाणेच भारतालाही अन्नधान्याच्या आघाडीवर मोठ्या कठीण परिस्थितीचा सामना करावा लागला असता.
 स्वतंत्रतावादाला सरंजामदारी भांडवलशाहीचे नाव देऊन, जुन्या स्वतंत्र पक्षाच्या विरोधात जो दुष्ट प्रचार केला गेला, त्याचा डाग धुऊन काढण्यात स्वतंत्र भारत पक्ष यशस्वी झाला आहे. या वेळी हा स्वतंत्रतावादी पक्ष प्रामुख्याने, शेतीवर जगणाऱ्या शेतकरी आणि शेतमजुरांच्या भक्कम पाठिंब्यावर उभा राहिला आहे. सहकारी संस्थांचा कंपू, साखर सम्राट आणि त्यांचा गोतावळा, अर्थातच, स्वतंत्र भारत पक्षाच्या जवळ येण्याचे कटाक्षाने टाळतात; कारण त्यांना नेहमी सत्तारूढ पक्षाच्या मागे राहणे अपरिहार्य असते.
 स्वतंत्र भारत पक्षाची निवडणुकांमधील कामगिरी काहीही असो, आर्थिक सुधारांसंबंधी चर्चेतील त्याच्या सहभागाला दखलपात्र म्हणून नेहमीच मान्यता राहील. त्याशिवाय, मुंबईत होणाऱ्या अधिवेशनाला त्यासाठी उपस्थित राहणाऱ्या शेतकऱ्यांच्या प्रचंड संख्येमुळे विशेष महत्त्व प्राप्त होणार आहे. देशभरातून लोटणारा हा शेतकऱ्यांचा समाज स्वतःच्या खर्चाने प्रवास करून येणार असून, राहण्याजेवण्याची सोयही स्वतःची स्वतःच करणार आहे. राहण्याजेवण्याची सोय म्हणजे आकाशाच्या छताखाली झोपणे आणि घरून बांधून आणलेल्या शिदोरीवर भूक भागविणे; अशा प्रसंगी इतर पक्षांकडून पुरविल्या जाणाऱ्या सोयीसुविधांची ते स्वतंत्र भारत पक्षाकडून अपेक्षाही करणार नाहीत.
 या सर्वच चमत्कारांच्या तुलनेत मध्य प्रदेशात सध्या जे चालले आहे, त्याच्याकडे दृष्टिक्षेप टाकणे उचित ठरेल. गुजराथमधील निवडणुकीतील इंदिरा काँग्रेसच्या दारुण पराभवानंतर मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री श्री. दिग्विजय सिंग यांनी त्यांच्या राज्यातील येत्या विधानसभा निवडणुकीत त्याचा वचपा काढण्याची प्रतिज्ञा केली आहे. भारतीय जनता पक्ष अशा आव्हानावर गप्प थोडाच बसणार! त्यांनी मध्य प्रदेशातील रस्ते व वीजपुरवठा यांच्या परिस्थितीबाबतीत दिग्विजय सिंग सरकारच्या भिकार कामगिरीविरुद्ध आंदोलन करण्यासाठी शेतकऱ्यांची जमवाजमव सुरू केली आहे. सध्या त्यांची निवडणूकप्रचाराची मोहीम सुरू करण्यासाठी भव्य शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्याची तयारी सुरू आहे. शेतकऱ्यांना मोठ्या संख्येने गोळा करून, त्यांना चांगले खाऊपिऊ घालून आणि 'हिंदुत्व किसान मेळाव्या'ला साजेशा वेशभूषेमध्ये सजवून, वाहतुकीची खास व्यवस्था करून, मेळाव्याला आणावे अशा सूचना त्यांच्या सर्व जिल्हा शाखांना

पोशिंद्यांची लोकशाही / २०६