पान:पोशिंद्याची लोकशाही (Poshindhyanchi Lokshahi).pdf/२१९

हे पान प्रमाणित केलेले आहे.

मिठाचा सत्याग्रह केला. त्यासाठी साबरमतीहून 'दांडीयात्रा' करीत चालत चालत गेले आणि ज्या ठिकाणी त्यांनी मीठ उचललं, त्या ठिकाणी आज एक ताम्रपट लावलेला आहे. त्यावर महात्माजींचे शब्द लिहिलेले आहेत, 'माझ्या मते, इंग्रज निघून जाणे म्हणजे स्वातंत्र्य नाही; जेव्हा या देशातल्या प्रत्येक नागरिकाला आपल्या भवितव्याला आपल्या इच्छेनुसार, आपल्या क्षमतेनुसार आकार देता येईल, तेव्हा हा देश स्वतंत्र झाला असे मी म्हणेन.' एक अमेरिकन पत्रकार त्यांत होते. त्यांनी गांधीजींची मुलाखत घेताना प्रश्न विचारला, 'फार उघड नाही; पण नेहमी आमच्या कानावर कुणकुण येते, की अध्यात्मवादी महात्मा गांधी आणि आधुनिक विचारांचे समाजवादी पंडित नेहरू यांच्यामध्ये फार मोठे मतभेद आहेत. परदेशांतील लोकांना हे मतभेद काय आहेत, ते समजावून घेण्याची फार इच्छा आहे. मला समजू शकेल अशा तऱ्हेने थोडक्यात सांगा.' गांधीजी हसले. क्लिष्टातले क्लिष्ट अध्यात्मसुद्धा सोप्या शब्दांत समजावून सांगण्याची त्यांची हातोटी मोठी अजब होती. ते म्हणाले, "मी एका वाक्यात पंडित नेहरू आणि माझ्यातील भेद सांगतो: 'मला असं वाटतं, की या हिंदुस्थानातून इंग्रज निघून गेला नाही तरी चालेल; पण अंग्रेजियत म्हणजे इंग्रजांची नीती गेली पाहिजे आणि पंडित नेहरूंना असं वाटतं, की या देशामध्ये अंग्रेजियत राहिली पाहिजे, इंग्रज निघून जायला हवा. हा दोघांमधला मोठा फरक आहे." महात्म्याने फार पुढचं पाहून वापरलेलं हे वाक्य. ही १९३० सालची गोष्ट.
 १९४७ मध्ये स्वातंत्र्य मिळालं आणि १९४८ मध्ये गांधीजींचा खून झाला. गांधीजींना ही कल्पना नव्हती, की ज्याला आपण शिष्योत्तम म्हटलं, आपला राजकीय वारस म्हटलं तोच इंग्रज निघून गेल्यानंतर थोड्याच दिवसांमध्ये हिंदुस्थानात 'अंग्रेजियत' कायम ठेवण्यासाठी मोठं कारस्थान रचणार आहे. गांधीजी गेले आणि त्यानंतर चारच वर्षांत समग्र गांधीविचाराला, अर्थवादाला उखडून टाकण्याचं काम त्यांच्या या शिष्योत्तमानं केलं. गांधींच्या मते, अर्थव्यवस्थेचा कणा शेती आहे. नेहरूंनी सांगितलं, सगळ्या अर्थव्यवस्थेचा कणा जड उद्योगधंदे, लोखंडाचे, सिमेंटचे कारखाने आहेत. गांधीजींनी म्हटलं, खेडं हा हिंदुस्थानचा आत्मा आहे; नेहरूंनी सांगितलं, की शहरांचा विकास झाला पाहिजे. गांधींनी सांगितलं होतं, की व्यक्तीनं प्रगती करायची आहे, सरकार नको; एवढंच नव्हे तर ते म्हणाले होते, 'माझा मुळी शासन या संस्थेलाच विरोध आहे. सगळ्या जगामधून सरकार नावाची गोष्ट नष्ट होऊन जावी अशी माझी इच्छा आहे; पण सगळ्या जगात इतकी सरकारं, त्यांना नष्ट करण्याची

पोशिंद्यांची लोकशाही / २२१