पान:पोशिंद्याची लोकशाही (Poshindhyanchi Lokshahi).pdf/२२९

हे पान प्रमाणित केलेले आहे.

दिवा दाखविणारा कोणी नाही आणि सामान्य नागरिक मोठा त्रस्त झाला आहे. कारण सुरक्षा नाही, सर्व वस्तूंच्या किमती प्रचंड वाढत आहेत, नोकऱ्या मिळत नाहीत, रोजगार मिळत नाही. आणि लोकांकडे जे काही थोडकं आहे त्यावरसुद्धा गुंडांची नजर असल्यामुळे त्यांना जगणं कठीण झालं आहे. घरातील मुलीला जर घरी यायला उशीर होऊ लागला तर ती सुखरूप घरी येईल किंवा नाही याबद्दल शंका वाटू लागते अशी परिस्थिती तयार झाली आहे. या परिस्थितीमध्ये काही किचकट सिद्धांत मांडून लोकांना मार्ग दाखविण्यात काही अर्थ नाही. मार्ग एकच आहे -
 साऱ्या जगामध्ये श्रेष्ठ कोणी नेता नाही, कोणी धर्मात्मा नाही, कोणी पुढारी नाही. या जगामध्ये व्यक्तीइतकं पवित्र कोणी नाही. श्रीमद् शंकराचार्यांच्या भाषेमध्ये 'मी (=व्यक्ती) आणि ब्रह्मांड' यांच्यामध्ये तिसरं कोणी नाही, ही भावना प्रत्येक व्यक्तीच्या मनामध्ये रुजली पाहिजे. व्यक्तीला जे योग्य वाटतं तेच राष्ट्राला योग्य आहे, व्यक्तीच्या पलीकडे राष्ट्राचं मोठेपण याला काही अर्थ नाही. व्यक्तीला वाव मिळाला तर व्यक्ती वाटेल ती कर्तबगारी करून दाखवते. हिंदुस्थानातील मनुष्य अमेरिकेत गेला, तर कर्तबगारी गाजवून धनाढ्य होतो, नाव कमावतो; पण तोच हिंदुस्थानात राहिला तर त्याचा कचरा होतो. याचा अर्थ असा, की हिंदुस्थानातील कर्तबगार, स्वातंत्र्यप्रिय नागरिक आणि पराक्रम व विकास यांच्यामध्ये एक मोठा अडथळा उभा आहे, तो म्हणजे भारतीय शासन व्यवस्था. या शासनव्यवस्थेचा उच्छेद करण्याची प्रतिज्ञा घेऊन, स्वतंत्र भारत पक्ष तुमच्यापुढे आला आहे. त्याला सक्रिय मदत करणे हे प्रत्येक स्वातंत्र्यप्रेमी नागरिकाचं कर्तव्य आहे.
 आणखी एक मुद्दा आहे. हिंदुस्थानातले अनेक सुजाण लोक म्हणतात, की राजकारण म्हणजे घाण, गटार झालं आहे. हे सत्य आहे आणि गेली वीसपंचवीस वर्षे शेतकरी संघटना आणि शेतकरी महिला आघाडीच्या निमित्ताने आणि त्याआधीही सरकारी नोकरीच्या निमित्ताने समाजात वावरताना माझ्यावर अजून कोणी चिखलाचा एक कणसुद्धा टाकलेला नाही; तरीसुद्धा आपल्या अंगावर डाग पडतील याची भीती न बाळगता, भारतीय राजकारणाचं हे गटार उपसण्याचा मी निर्णय केला आहे आणि माझी तुम्हा सर्वांना आणि देशातील सर्व सुजाण, कर्तबगार, स्वातंत्र्यप्रेमी नागरिकांना विनंती आहे, की तुमच्या अंगावरील हे निष्कलंक पांढरेशुभ्र परीटघडीचे कपडे आहेत, त्यांच्यावर डाग पडतील म्हणून फार काळजी करू नका. कपडे मळले तर धुता येतील, डाग

पोशिंद्यांची लोकशाही / २३१